TB : करू क्षयरोगावर मात!

TB : करू क्षयरोगावर मात!

24 मार्च हा दिवस 'जागतिक क्षयरोग दिन' म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जगभर साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने या दिवशी एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी क्षयरोग दिनाचे जे घोषवाक्य होते, तेच याही वर्षी कायम ठेवले आहे. ते घोषवाक्य म्हणजे, होय! आपण क्षयरोग संपवू शकतो.
Yes ! We can end TB.

होय ! आपण क्षयरोग संपवू शकतो, हेच घोषवाक्य ठेवण्यामागचा हेतू हा की, आपल्याला क्षयरोगाचे निर्मूलन-उच्चाटन करायचे आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात येईल. एकमेकांमध्ये संसर्गाद्वारे पसरणारा हा क्षयरोग पृथ्वीवरून नाहीसा करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. भारतात इ. स. 2025 पर्यंत क्षयरोग संपुष्टात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहून क्षयरुग्णांची संख्या कमी करण्यासाठी मदत करायला हवी.

जगभरात 2022 या एका वर्षात 1 कोटी 6 लाख जणांना क्षयाचा संसर्ग झाला आणि त्या वर्षी 13 लाख जण क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडले. हे वास्तव लक्षात घेता, ही लढाई किती कठीण आणि महत्त्वाची आहे, हे लक्षात येईल.

क्षयरोग म्हणजे र्ढीलशीर्लीश्रेीळी हा अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा आणि 'मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस' नावाच्या जीवाणूमुळे होणारा आजार नख, केस आणि दात वगळता शरीराच्या कोणत्याही अवयवात होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख 'राजयक्ष्म' असा आढळतो. अशा या आजाराचे नेमके कारण कित्येक शतके माहीत नव्हते. हा आजार 'मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस' नावाच्या जीवाणूमुळे होतो, हे रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने 24 मार्च 1882 या दिवशी सिद्ध केले. म्हणून हा क्षयरोग दिवस.
क्षयरोगाचे नेमके कारण समजून 142 वर्षे उलटली, तरीही क्षयरोग आपल्यातून संपला नाही. या संशोधनानंतर, क्षयरोगावरील प्रभावी औषध सापडायला पन्नास वर्षांहून अधिक काळ जावा लागला. त्यानंतर हळूहळू एक एक करत अनेक औषधे क्षयरोगावर उपयुक्त ठरू लागली. पण, क्षयरोग नेस्तनाबूत करण्यासाठी या औषधांचा दुर्दैवाने उपयोग झाला नाही. याला अनेक कारणे आहेत. औषधाला दाद न देणारा क्षयरोग हे त्यातील महत्त्वाचे आणि त्रासदायक कारण म्हणता येईल. पण, अशा प्रकारचा क्षयरोग किंवा क्षयरुग्ण निर्माण होण्यामागे आपली मानसिकता कारणीभूत आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे.

एखाद्या व्यक्तीला क्षयरोग झाला, तर तो लक्षात यायला काही काळ जातो. कारण सुरुवातीची लक्षणे… उदा. संध्याकाळचा बारीक ताप – कणकण येणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, खोकला, खोकल्यातून बडका पडणे, क्वचित प्रसंगी रक्त पडणे, दम लागणे अशा तक्रारी हळूहळू आणि कमी तीव्रतेत सुरू होतात. अनेकजण या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत नाहीत. परिणामी हा विकार बळावतो. एकदा का या आजाराचे निदान झाले आणि उपचार सुरू झाले की, वर नमूद केलेल्या तक्रारी काही दिवसांत कमी होतात आणि रुग्ण बेसावध होतो. खरे तर, शरीरातील क्षयरोगाचा पूर्ण नायनाट होण्यासाठी त्या व्यक्तीने किमान सहा महिने नियमितपणे औषधोपचार घ्यायला हवा. पण, पूर्ण सूचना देऊन सुद्धा अनेक जण औषधोपचारात टंगळमंगळ करतात. शरीराच्या तक्रारी कमी झालेल्या असतात. त्यामुळे त्यांना आजाराचे गांभीर्य समजत नाही.

निरक्षरता, दारिद्य्र तसेच अनेक वैयक्तिक अडचणी यामुळे आजाराविषयीचे भान आणि उपचाराविषयीचे ज्ञान या दोन्ही गोष्टी दुर्लक्षित होतात. याचा परिणाम म्हणून क्षयरोगावरील उपचारात खंड झाला, तर क्षयाचे जंतू निर्ढावतात आणि उपचाराला दाद देईनासे होतात. अशा क्षयरोगाला एमडीआर किंवा एक्सडीआर प्रकारचा क्षयरोग असे म्हणतात. एमडीआर किंवा एक्सडीआर टीबी असलेला रुग्ण दरवर्षी नवीन पंधरा लोकांना क्षयाचा संसर्ग देतो आणि तो अशाच प्रकारचा गंभीर क्षयरोग असू शकतो. या प्रकारचा क्षयरोग इतर व्यक्तींमध्ये पसरत राहिला तर क्षयरोग नियंत्रण करणे कठीण होऊन बसते.

ज्या व्यक्तीला फुफ्फुसाचा क्षयरोग झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या थुंकीत क्षयाचे जंतू आहेत, अशा व्यक्तींकडून क्षयरोग पसरतो. उघड्यावर शिंकणे, खोकणे, थुंकणे, मोठ्याने बोलणे, हसणे अशा क्रियांमधून क्षयाचे जंतू क्षयरुग्णांकडून निरोगी व्यक्तींमध्ये पसरतात आणि क्षयरोगाचा संसर्ग वाढतो.

जेव्हा क्षयाचा जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतो, तेव्हा शरीरात क्षयजंतूंची वाढ होते; पण त्याचे रूपांतर प्रत्यक्ष आजारात होत नाही. अशा रुग्णांमध्ये क्षयाची लक्षणे दिसून येत नाहीत. या स्थितीला अव्यक्त क्षयरोग (ङरींशपीं ढइ) असे म्हणतात. अशा व्यक्तींपैकी जवळपास दहा टक्के व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होतो. कोणत्याही कारणामुळे अशा व्यक्तीची रोगप्रतिकारकक्षमता कमी झाली, तर या संसर्गाचे रूपांतर क्षयरोगामध्ये होते.

वर नमूद केलेली लक्षणे आढळली, तर आळस न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा आणि तो क्षयरोग आहे का याची खातरजमा करून घ्यावी. रुग्णाची थुंकी तपासणी, रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे , लसिका ग्रंथी वाढली असेल तर त्याची एफ.एन. ए. सी. किंवा बायोप्सी करून क्षयरोगाचे निदान होते. जर थुंकीत क्षयाचे जंतू सापडले नाहीत, तर ब्राँकोस्कोपी करून श्वासनलिकेतील स्राव तपासून त्यानुसार क्षयरोगाचे निदान करता येते.

क्षयरोग असेल तर तातडीने उपचार सुरू करावेत आणि ते नियमितपणे संपूर्ण कालावधीसाठी घ्यावेत. म्हणजे कोणालाही क्षयमुक्तहोता येईल.

क्षयरोगाचा प्रसार थांबवता येतो; पण त्यासाठी अशा रुग्णांचे त्वरित निदान करून, उत्तम औषधोपचार देऊन त्यांना रोगमुक्त करणे आणि त्यांच्यापासून समाजात पसरणारा क्षयरोग थांबवणे, हे महत्त्वाचे पाऊल ठरते. यासाठी सर्वांनी क्षयरोगाची माहिती घ्यावी. उघड्यावर शिंकणे, कुठेही उघड्यावर थुंकणे टाळावे. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने, क्षयरोग समजावून घेऊन सर्वांनी सजगपणे एकत्र प्रयत्न केले, तर आपण क्षयरोग संपवू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news