पारगाव : उसतोड सुरु असताना आढळले बिबट बछडे

शिंगवे येथिल पाबळे मळ्यात उसतोड सुरु असताना आढळून आलेला बिबट बछडा. (छाया : किशोर खुडे)
शिंगवे येथिल पाबळे मळ्यात उसतोड सुरु असताना आढळून आलेला बिबट बछडा. (छाया : किशोर खुडे)

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : शिंगवे  येथिल पाबळे मळ्यात ऊसतोड सुरू असताना दोन बिबट बछडे आढळून आल्याने ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ही घटना गुरुवारी (दि. ९) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यातील एक बछडा उसाच्या शेतात निघून गेला, तर दुसरा बछडा वनविभागाच्या ताब्यात सुखरूप आहे.

शिंगवे गावाच्या पूर्वेला पाबळे मळा आहे. तेथे ज्ञानेश्वर बाळू पाबळे हे शेतकरी राहतात. गुरुवारी (दि. ९) सकाळी ऊसतोड सुरू झाली. दरम्यान नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे २ बछडे आढळून आले. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली. त्यांनी लगेचच आरडाओरडा केला. यामुळे दोन बछड्यांमधिल एक बछडा उसाच्या शेतात निघून गेला. दुसरा बछडा वनविभागाच्या ताब्यात सुखरूप आहे.

या घटनेची खबर मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी प्रदीप कासारे, वनरक्षक एस. एस. दहातोंडे वन कर्मचारी संपत भोर, शरद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन बछड्याला ताब्यात घेतले. पाबळे मळा परिसरात सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे. तेथे अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. उसतोडी सुरु असल्याने उसतोड कामगार, शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान उसतोड थांबविण्यात आली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news