राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : रेटवडी आणि जऊळके खुर्द (ता. खेड) येथे तीन महिलांवर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्या शुक्रवारी (दि. १३) रात्री आठच्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. दोन गावात उच्छाद घालून शिवारात दडून बसलेला हा बिबट्या ४८ तासांत जेरबंद करण्यात राजगुरूनगर वनपरिक्षेत्र विभागाला यश मिळाले असून याबाबत दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याचे सांगत त्याला ही तातडीने पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय आठवड्यापूर्वी रेटवडी आणि जऊळकेच्या मध्यावर असलेल्या चासकमान डाव्या कालव्याच्या पुलावर काही नागरिकांनी रात्री चार बिबटे व दोन बछडे पाहिल्याचे बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर यांनी सांगितले.
मंगळवारी रेटवडी गावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांवर हल्ले झाले होते. तसेच गुरुवारी सकाळी जऊळकेत हल्ला झाला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गेली ४८ तास ड्रोनद्वारे परिसरात टेहळणी केली होती. त्यात जऊळके येथे शेतात बिबट्या असल्याचे दिसून आले होते. या भागात मोठ्या क्षेत्रात संपूर्ण जाळी लावून बाहेर पडण्याच्या मार्गावर पिंजरा लावण्यात आला होता. रात्री आठ वाजता बिबट्या त्यात अडकला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौन्धळ, दत्तात्रय फापाळे, शिवाजी राठोड, संदीप अरुण यांच्या पुढाकाराने ही कारवाई केली.