Leena Nair : मला मोठेपणी सीईओ व्हायचंय..!

कोल्हापूर : धैर्यप्रसाद हॉल चौकात लीना नायर यांचा सत्कार करताना मैत्रिणी.
कोल्हापूर : धैर्यप्रसाद हॉल चौकात लीना नायर यांचा सत्कार करताना मैत्रिणी.

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : Leena Nair : शाळेत असताना विचारले जायचे मोठे झाल्यावर कोण, काय होणार, कोणी म्हणायचे डॉक्टर, तर कोणी इंजिनिअर; पण यातील एकीने मला सीईओ व्हायचं, असं सांगितलं आणि आज खरोखरच ती सीईओ झाली.

शॅलेन कंपनीच्या सीईओपदी लीना नायर ( Leena Nair ) यांची निवड झाली. त्यानंतर त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल बोलत होत्या कोल्हापूरमधील नायर यांच्या बालमैत्रीण आणि होलिक्रॉस स्कूलपासून ते आज सीईओपर्यंतच्या प्रवासाच्या साक्षीदार असणार्‍या डॉ. दीपा वानखेडे.

होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलपासूनच आम्ही दोघी खास मैत्रिणी. पहिलीपासून ते दहावीपर्यंत लीनाने शाळेचा पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. ती सतत अभ्यासात मग्न असायची. अभ्यासाबरोबरच ती खेळातही हुशार. लीना ( Leena Nair ) ब्ल्यू हाऊसमध्ये, तर मी रेड हाऊसमध्ये होते. नंतर न्यू कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इलेक्ट्रॉनिक्स विषय घेतला होता; पण यावेळी तिचा पहिला क्रमांक हुकला. तिची मैत्रीण पहिल्या क्रमांकावर, तर लीना दहाव्या क्रमांकावर गेली. मार्क कमी पडले म्हणून ती खूप नाराज होती. शिक्षकांकडे जाऊन 'मला कुठे मार्क कमी पडले' अशी विचारणा करायची. तेव्हा अजून खूप मोठे करिअर आहे. पुढे कायम पहिल्या क्रमांकावर राहायचा प्रयत्न कर, असा गुरुमंत्र शिक्षकांनी दिला. हाच गुुरुमंत्र घेऊन गेलेली लीना आज जागतिक पातळीवरील कंपनीत सीईओ झाली, ही आमच्यासाठी व सर्व कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगत वानखेडे यांनी लीना नायर यांचा जीवनपट उलगडला.

शालेय जीवनापासून लीना ( Leena Nair ) खूप खेळकर. कोणत्याही क्षेत्राचे नेतृत्व करायची तिला आवड. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वालचंद कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स विभागातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातही तिने सर्वाधिक गुण मिळवले म्हणून तिची मिरवणूक काढली होती.

2015 मध्ये ती कोल्हापुरात आली होती. तेव्हा आम्ही सर्व वर्गमैत्रिणींनी धैर्यप्रसाद हॉल चौकात भव्य पोस्टर लावून तिचे स्वागत केले. कोल्हापुरात आली की पुरणपोळी आणि मटण, तांबडा-पांढरा रस्सा हे तिचे आवडते जेवण. आपण मोठ्या कंपनीची सीईओ असल्याचा गर्व तिने कधीच बाळगला नाही. आजही कोल्हापुरात आल्यावर मैत्रिणींच्या घरी जाणे, त्यांच्याशी बोलणे, गप्पा मारणे तिला खूप आवडते. जागतिक पातळीवर लीनाची झालेली निवड आणि जगभरातून तिचे होणारे कौतुक पाहून मला विशेष अभिमान वाटतो. ती कोल्हापूरची असल्याने या अत्यानंदात आणखीनच भर पडल्याचे डॉ. दीपा वानखेडे यांनी सांगितले.

आज आई हवी होती… ( Leena Nair )

लीना नायर यांच्या आईचे जून 2021 मध्ये निधन झाले. आई माझ्यासाठी कायम प्रेरणास्रोत होती. शाळेत पहिला नंबर आला की, मी प्रथम तिलाच सांगायचे. आई मग शाबासकी द्यायची. आज एवढ्या मोठ्या पदावर माझी निवड झाली; पण हे सांगायला आणि शाबासकीची थाप द्यायला आई नाही. ती हवी होती, असा मेसेज लीना नायर यांनी पाठवल्याचे सांगतानाच वानखेडे यांचे डोळे पाणावले.

कोल्हापूर ते लंडन उत्तुंगभरारी; लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या

  • कार्तिकेयन कुटुंबामध्ये जन्मलेल्या लीना यांचे प्राथमिक शिक्षण ताराबाई पार्कातील होलिक्रॉस कॉन्व्हेंट या शाळेत झाले.
  • सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयातून विशेष गुणवत्तेत पदवी संपादन केली होती.
  • जमशेदपूर येथील झेव्हियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमध्ये सुवर्णपदकासह व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादित केली.
  • 1992 मध्ये त्यांनी हिंदुस्थान युनिलिव्हर या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
  • गेल्या 30 वर्षांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची ध्वजपताका रोवत जागतिक उद्योगातील हे महत्त्वाचे शिखर गाठले आहे.
  • कोल्हापूरकरांसाठी तर लीना नायर या उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जागतिकस्तरावर भरारी घेणार्‍या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news