आळंदी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आळंदीमध्ये तुम्ही कधी आलात, तर आळंदी पहिल्या सारखी राहिली नाही. पहिले महाराज लोकांना चोरासारखं राहाव लागत होते, आता आम्ही आळंदीत सगळ्यांचे बाप आहोत. आळंदीत काही मॅटर घडू द्या, मला कळू द्या, जर तुमचं मॅटर सोडवला नाही तर मी कीर्तन सोडून देईल. पायावर जाऊ नका बिघडणार नाय हाणतोय मी. पोलीस स्टेशनचं मॅटर असू द्या, दवाखान्याचं असू द्या, काही असू द्या दहा मिनिटात रफा दफा. हे वक्तव्य हभप लक्ष्मण महाराज पाटील यांनी एका किर्तनातून केले.
हा व्हिडिओ आळंदीत सोशल मीडियावर आल्यावर या वक्तव्याचा आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने हभप लक्ष्मण महाराज पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायमध्ये ही भाषा महाराज मंडळींना शोभते का असा सवाल करत लक्ष्मण महाराज पाटील यांनी जाहीर माफी ग्रामदैवत भैरवनाथा समोर मागावी अशी मागणी समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने आळंदी पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
यावर लक्ष्मण महाराज पाटील यांचा दिलगिरी व्यक्त करतानाचा व्हिडिओ आला आहे. ते म्हणाले, माझ्या भूतकाळात झालेल्या किर्तनातील वक्तव्यामुळे आळंदीतील कोणाच्या व्यक्तीगत भावना जर दुखावल्या असतील तर त्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही व्यक्तीगत भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.
हा दिलगीर नामा व्हिडिओ आल्यावरही आळंदीकरांचे समाधान झाले नाही. सदर महाराजांनी आळंदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामदैवत भैरवनाथासमोर जाहीर माफी मागावी अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी आळंदीतील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी, तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.