लातूर : दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही; चिठ्ठी लिहीत तरूणाने जीवन संपवले

तरूणाने जीवन संपवले
तरूणाने जीवन संपवले

लातूर; पुढारी वृत्तसेवा सततची नापिकी व मराठा आरक्षण मिळत नसल्याने व्यतीत होऊन एका तरुणाने विष घेत जीवन संपवण्याचा प्रयत्‍न केला. त्‍याच्यावर उपचार सुरू असताना आज (शनिवार) सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. महेश बाबुराव कदम (वय २६) असे या युवकाचे नाव असून ते ढाळेगाव ग्रामपंचायतिचे सदस्यही होते.

आरक्षणाअभावी मराठा समाजाची मोठी परवडत होत आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अवघड झाले आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळणे कठीण झाले आहे. हे दूर करण्यासाठी आरक्षण हाच समर्थ पर्याय असला तरी ते मिळत नसल्याने तसेच शेतीतूनही माफक उत्पन्न निघत नसल्याने महेश बेचैन होते. शुक्रवारी दुपारी ते त्यांच्या शेतात गेले. या साऱ्याचा ताण असह्य झाल्याने त्यांनी दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही अशी चिठ्ठी लिहून त्यांनी विष घेतले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.

तेथील शेतकरी तेथे धावत आले व त्यांनी तातडीने त्यांना अहमदपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना आज (शनिवार) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या ढाळेगाव या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने मराठा समाजात संताप पसरला असून, अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर सरकार आरक्षण देणार आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील अनेक मराठा समाज बांधव ढाळेगाव येथे महेश कदम यांच्या अंत्यविधीसाठी रवाना झाले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news