सांगली : कोकणेवाडीसह चार गावांना भूस्खलनाचा धोका
शिराळा; विठ्ठल नलवडे : शिराळा डोंगरी तालुक्यातील पाच वाडी-वस्तीवरील गावांना भूस्खलन, दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोकणेवाडी, भाष्टेवस्ती धामणकर वस्ती, मिरखेवाडी, डफळेवाडी या डोंगर कपारीतील गावांना भूस्खलन व दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्रशासनाने याची दखल घेऊन ठोस उपाययोजना केली नाही. या गावातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. तशी मागणी देखील होत आहे. या गावातील बहुसंख्य घरात दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचे उमाळे लागतात. डोंगरांना भेगा पडतात.
दरम्यान, या गावांतील लोकांना सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या पाच गावांत लोक जीव धोक्यात घालून राहत आहेत. वीज नसते, रस्ता सुरक्षित नाही.
कोकणेवाडी येथील 47 कुटुंबे (278 रहिवासी) भाष्टेवस्ती : 12 कुटंबे (49 रहिवासी), धामणकरवस्ती 7 कुटुंब (26 रहिवासी), मिरखेवाडी 53 कुटुंब (209 रहिवासी), डफळेवाडी कुटुंब 26 (106 रहिवासी) असे एकूण 145 कुटुंबातील 668 कुटुंबे येथे राहत आहेत. भूस्खलनाने बाधित होण्याची शक्यता असलेल्या पाच वाडी- वस्तीवरील 125 कुटुंबातील
590 नागरिकांचे तातडीने स्थलांतर होणे गरजेचे आहे.