राज्याच्या घशाला यंदा कोरड पडण्याची चिन्हे!

राज्याच्या घशाला यंदा कोरड पडण्याची चिन्हे!

कोल्हापूर : पावसाचा अभाव आणि धरणांमधील अपुरा पाणीसाठा यामुळे यंदा राज्याच्या घशाला कोरड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात आजघडीला धरणांच्या एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षा तब्बल 558 टीएमसी कमी पाणीसाठा झाल्याचे दिसून येत आहे. कोयना, जायकवडी, उजनी, गोसीखुर्द यांसारखी प्रमुख धरणे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. तशातच पाऊसही गायब झाला असल्याने येणार्‍या काळात राज्यातील धरणे भरण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात मोठी, मध्यम आणि लहान प्रकारची मिळून एकूण 2994 धरणे आहेत. गेल्यावर्षी याच दिवसांत या सर्व धरणांमध्ये मिळून जवळपास 80 टक्के पाणीसाठा होता. यंदा हेच प्रमाण अवघ्या 60 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यातही 15 टक्के पाणीसाठा हा पूर्वीचाच शिल्लक साठा आहे. म्हणजे यंदा राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात केवळ 45 टक्के भर पडलेली दिसत आहे. राज्यातील सर्व धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता 1703 टीएमसी इतकी आहे. मात्र सध्या या धरणांमध्ये 1145 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. सगळी धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून 558 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र गायब झालेला पाऊस आणि पावसाचे एकूण प्रमाण विचारात घेता यंदा राज्यातील प्रमुख धरणे भरण्याची शक्यता दिसून येत नाही.

राज्यात एकूण 139 मोठी धरणे आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता 1255 टीएमसी इतकी आहे; मात्र सध्या या धरणांमध्ये केवळ 919 टीएमसी पाणीसाठा आहे. मध्यम धरणांची संख्या 260 असून त्यांची पाणी साठवण क्षमता 218 टीएमसी इतकी आहे. मात्र सध्या या मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 131 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. 2595 छोट्या धरणांची पाणी साठवण क्षमता 230 टीएमसी इतकी आहे, मात्र सध्या या छोट्या धरणांमध्ये केवळ 94 टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे. मध्यम आणि छोटे प्रकल्प त्या त्या भागातील नागरिकांची आणि पिकांची पाण्याची गरज भागविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र यंदा या प्रकल्पांमध्ये अत्यंत मर्यादित पाणीसाठा असल्यामुळे स्थानिक पातळीवर टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील 139 मोठ्या धरणांपैकी 48 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. आठ धरणांमध्ये 15 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे आठ धरणांमध्ये तर उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. त्यामुळे या मोठ्या धरणांच्या कार्यक्षेत्रात टंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता दिसून येत आहे.

यंदा राज्यातील कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षीच्या सरासरीइतका पाऊस झालेला नाही. सर्वच प्रमुख धरणांच्या परिसरात गेल्यावर्षीच्या तुलनेत 40 ते 60 टक्के इतकाच पाऊस झालेला आहे. त्यामुळे राज्यातील धरणे भरण्यास मर्यादा पडलेल्या आहेत. यंदा पावसाची सुरुवातच जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात झाली होती. जवळपास दोन ते तीन आठवडे झालेल्या जोरदार पावसामुळेच सध्या धरणात जेमतेम पाणी जमा झाले आहे; मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाऊस जणू काही गायबच झाला आहे. नजीकच्या काळात जोरदार पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत साशंकताच आहे. तसे झाले तर मात्र यंदा राज्यातील जनतेला किमान काही प्रमाणात का होईना पण टंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची लक्षणे आतापासूनच दिसू लागली आहेत.

प्रमुख धरणांमधील सध्याचा पाणीसाठा (टक्के)

उजनी : 13.22 टक्के, कोयना : 78.34, टेमघर : 70.93, खडकवासला : 77.07, भाटघर : 84.41, पिंपळगाव-जोगे : 48.07, वैतरणा : 77.88, कडवा : 87.99, अर्जुनसागर : 56.39, गोसीखुर्द : 45.52, अप्पर घाटघर : 41.05, जायकवडी : 34.27 आणि अप्पर वर्धा : 83.56 टक्के एवढाच पाणीसाठा या धरणांमध्ये असून ही धरणे भरायला अजून बराच कालावधी लागू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news