गायकवाड टोळीकडून पाठलाग करत तरुणावर तलवार हल्ला

file photo
file photo

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कुमार गायकवाड खून प्रकरणातील संशयितासोबत फिरल्याच्या रागातून सौरभ संजय साळुंखे (23, रा. मोरेवाडी रोड, राजेंद्रनगर) याच्यावर रविवारी रात्री खुनी हल्ला झाला. भररस्त्यात पाठलाग करून तलवार, एडक्याने झालेल्या हल्ल्यात सौरभचे मनगट तुटले. याप्रकरणी त्र्यंबक गवळी, अमित गवळी, सुमित गवळी (रा. तिघे राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तू आमचे विरोधक रवी भोसले, साहिल मणेर यांच्यासोबत का फिरतोस, अशी विचारणा करीत हा हल्ला झाला. अर्धवट तुटलेल्या मनगटासह सौरभ मोठ्याने ओरडत धावत होता. जखमी अवस्थेत त्याला सीपीआरमध्ये आणण्यात आले. तिथून मध्यरात्री खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

फिर्यादी सौरभ साळुंखे याचे रेशन दुकान आहे. रविवारी रात्री तो मित्रांसोबत तपोवन मैदानावर प्रदर्शन पाहण्यासाठी आला होता. रात्री 11 च्या सुमारास कळंबा साई मंदिर परिसरात थांबला असताना संशयित त्र्यंबक, अमित व सुमित हत्यारांसह तेथे आले. तू आमच्या विरोधकांसोबत फिरतोस, असे बोलत सौरभला मारहाण करण्यास सुरुवात केली. सौरभ पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लोखंडी गज डोक्यात मारण्यात आला. तलवारीने केलेला वार अडविण्याच्या प्रयत्नात सौरभचा हात मनगटातून अर्धवट तुटला.

सौरभ जीवाच्या आकांताने रस्त्यावरून पळत सुटला. स्वत:चा बचाव करत त्याने शासकीय इस्पितळ गाठले. प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

गायकवाड टोळी पुन्हा सक्रिय

नोव्हेंबर 2022 मध्ये टोळीयुद्धातून कुमार गायकवाड याचा टेंबलाईवाडी उड्डाणपुलानजीक निर्घृण खून झाला होता. या प्रकरणातील संशयित अमर मानेसह चौघे अटकेत आहेत. दोघांच्या टोळीतील हे टोळीयुद्ध रविवारी झालेल्या हल्ल्याने पुन्हा दिसून आले. अमर माने याच्या समर्थकांकडूनही काही दिवसांपूर्वी कारागृहातील एक व्हिडीओ व्हायरल करून विरोधकांना इशारा देण्यात आला होता. यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाल्याने दोन्ही टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा राजेंद्रनगर परिसरात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news