सातारा : टंचाई लक्षात घेऊन ‘कोयना’च्या पाण्याचे नियोजन

कोयना धरण
कोयना धरण
Published on
Updated on

पाटण : यावर्षीच्या पावसाळ्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही सरासरीपेक्षा कमी पाऊस व त्याच पटीत पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे चालू तांत्रिक वर्षात याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. कोयनेतील पाण्याचा सिंचनाला प्राधान्यक्रम देण्यात आला असून, आतापर्यंत सिंचनासाठी तुलनात्मक जादा पाणी सोडण्यात आले आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा, आगामी काळातील सिंचन व पश्चिम वीजनिर्मितीची गरज आणि नव्या तांत्रिक वर्षात किमान शिल्लक पाणीसाठा याचे नियोजन करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सध्या भलेही पाणीसाठा शिल्लक असल्याचे तांत्रिक चित्र असले तरी आतापासूनच मोठ्या प्रमाणावर पाणीवापर झाला तर भविष्यात वीजनिर्मिती, शेती पेक्षाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याचे संकेत मिळत असल्याने त्या दृष्टीनेच प्रशासनाकडून याबाबत सावधपणे पावले उचलली जात आहेत.

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. धरणाचे तांत्रिक वर्ष 1 जून ते 31 मे असे असले तरी सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याचे मोजमाप 15 ऑक्टोबरनंतर केले जाते. यावर्षी ऐन पावसाळ्यात व त्यानंतरही 15 ऑक्टोबरपर्यंत सिंचनासाठी ज्यादा पाणी वापर झाला आहे. एक जूनला धरणात 17.64 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. पावसाळ्यात धरण पाणलोट क्षेत्रात तुलनात्मक कमी असा 5019 मि.मी. पाऊस झाल्याने एकूण 106.65 टीएमसी पाणी आवक झाली. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 39. 71 टीएमसी पाण्याची आवक घटली व दुसरीकडे एक जून ते 14 ऑक्टोबर दरम्यान सिंचन 5.47 व वीजनिर्मितीसाठी 23.03 टीएमसी पाणी वापर झाला आहे. यावर्षी सिंचनासाठी वर्षभरात 42.70 टीएमसी पाण्याचे नियोजन असून खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचा तसेच उपसा व पिण्याच्या पाण्याच्या योजना याचा विचार करूनच प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. उपलब्ध पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे पाणी वापरात काही प्रमाणात कपात करण्याचाही विचार आहे.

मागील वर्षी 15ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान रब्बी हंगामामध्ये 1.42 तर चालू वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार धरणातून दोन टीएमसी पाणी यापूर्वी सोडण्यात आले आहे. चालू वर्षात कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन सुरू असून पिण्याच्या पाण्यासह सिंचन व वीजनिर्मितीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल तसेच पुढील वर्षी जून व जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस व पाणी आवक न झाल्यास पिण्यासह इतर आवश्यक गरजांसाठी धरणामध्ये किमान पाणीसाठा उपलब्ध राहील व रब्बी हंगामात होणारा पाणीवापर व धरणातील शिल्लक पाणीसाठा याचा विचार करुनच प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत . यावर्षी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे योग्य व काटकसरीने नियोजन करणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे. सिंचनासाठी पाण्याचे दुर्भिक्ष सुरू झाल्याने त्याचे परिणाम अधिक तीव्र असतील.

कोयना धरण सद्यस्थिती

उपलब्ध पाणीसाठा – 85.37 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा – 80.25 टीएमसी पश्चिम वीजनिर्मिती पाणीवापर – 27.71 टीएमसी सिंचन पाणीवापर – 7.16 टीएमसी पूरकाळात सोडलेले पाणी – 2.52 टीएमसी
एकूण पाण्याची आवक – 108.42 टीएमसी लवाद वीजनिर्मिती शिल्लक पाणीकोटा -39.79 टीएमसी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news