kolhapurs air pollution : कोल्हापूरचे हवा प्रदूषण धोका पातळीवर

kolhapurs air pollution
kolhapurs air pollution

कोल्हापूर :  शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे पॅचवर्क, औद्योगिक वसाहतींचे धुराडे आणि बेसुमार वाहनांची वाढ अशा अनेक कारणांमुळे स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूरला प्रदूषणाचे अक्षरशः ग्रहण लागले आहे. एमपीसीबीच्या अहवालानुसार गेल्या सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता सिंचन भवन परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 290 वर पोहोचला होता. ही धोकादायक स्थिती असून या हवेत जास्त काळ वावरल्यास श्वसनास त्रास होऊ शकतो. वेळीच ठोस पावले न उचलल्यास दिल्ली, मुंबईसारखी स्थिती कोल्हापूरवर उद्भवू शकते.

वाढत्या वायू प्रदूषणामुळे कोल्हापूर शहराचा समावेश देशातील 131 सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 23 ऑक्टोबरच्या सिंचन भवन परिसरातील अहवालानुसार, सर्वात घातक मानल्या जाणार्‍या पीएम 2.5 चे 24 तासांतील सरासरी प्रमाण 290 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर इतके होते. तर येथील पीएम 2.5 सर्वाधिक प्रमाण हे 320 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर होते. पीएम 10 चे सरासरी प्रमाण 144 मायक्रोग्रॅम क्युबिक मिटर तर सर्वाधिक प्रमाण 174 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर इतके होते.
या ठिकाणी सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान हवेची गुणवत्ता सर्वाधिक ढासळली होती. सकाळी सहा वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक 283 इतका होता. सात वाजता हा निर्देशांक 289 वर तर आठ वाजता 290 इतका झाला होता. या हवेमध्ये जास्तकाळ वावरल्यास श्वासनास त्रास होऊ शकतो.

खराब रस्त्यांमुळे 22 टक्के प्रदूषण

एमपीसीबीच्या एका अहवालानुसार शहराच्या प्रदूषणामध्ये 22 टक्के वाटा हा खराब रस्त्यांचा आहे. चाळण झालेले रस्ते, निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क, फूटपाथवर ठिकठिकाणी खर मातीचे ढीगच्या ढीग टाकण्यात आले आहेत. यामुळे शहरात धूळच धूळ पाहायला मिळत असून धूलिकणांचे (पार्टिक्युलेट मॅटर) प्रमाणही वाढत आहे.

प्रमुख शहरांमधील हवेची गुणवत्ता
(23 ऑक्टोबर सकाळी 8 वा.ची स्थिती)
शहर                             वायू गुणवत्ता
दिल्ली (डीपीसीसी)              333
कोल्हापूर (सिंचन भवन)       290
मुंबई (कुलाबा)                   250
पुणे (रेव्हेन्यू कॉलनी)           202
सांगली (विजयनगर)           112
सोलापूर (ज्ञानेश्वर नगर)       223

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news