कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेला मिळेना ‘ग्रीन सिग्नल’!

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेला मिळेना ‘ग्रीन सिग्नल’!
Published on
Updated on

कोल्हापूर, सुनील कदम : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाची घोषणा होऊन दहा वर्षांचा कालावधी लोटला; पण अजूनही या मार्गाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. हा रेल्वेमार्ग सुरू झाला तर केवळ कोल्हापूरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठीही विस्तीर्ण विकासाच्या वेगळ्या वाटा तयार होणार आहेत. त्यामुळे कोकणातील नेत्यांप्रमाणे या कामासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावण्याची गरज आहे.

कोकण रेल्वेचे वैभव!

कोसळणार्‍या डोंगरकडा, धो धो वाहणार्‍या नद्या, प्रचंड पाऊस यामुळे कधीकाळी कोकणातून रेल्वे धावू लागेल, असे सांगितले असते तर त्याला वेड्यात काढले गेले असते. मात्र बॅरिस्टर नाथ पै, स्व. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, सुरेश प्रभू या कोकणातील नेत्यांनी कोकण रेल्वेचे नुसते स्वप्नच पाहिले नाही तर अथक प्रयत्नांती ते साकार करून दाखविले. 15 सप्टेंबर 1990 रोजी कोकण रेल्वेची पायाभरणी झाली आणि 26 जानेवारी 1999 रोजी म्हणजे अवघ्या नऊ वर्षांत 741 किलोमीटर लांबीच्या या मार्गावरून रेल्वे धावायलाही लागली. आज कोकण रेल्वे मार्गाची उभारणी ही एक ऐतिहासिक घटना समजली जाते. या रेल्वेमुळे कोकणच्या विकासाची कवाडे खुली झाली. केवळ कोकणच नव्हे तर दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांना या रेल्वेमार्गाचा चांगलाच लाभ झाला आहे. या रेल्वेमार्गामुळे देशाच्या किनारपट्टी भागात वेगवेगळ्या औद्योगिक संधी निर्माण झाल्या आहेत. कोकणातील नेत्यांची दर्दम्य इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नांमुळे ते शक्य झाले.

कोल्हापूर-वैभववाडीचे रडगाणे!

जवळपास दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर -वैभववाडी या नव्या रेल्वेमार्गाची घोषणा झाली. या मार्गासाठी म्हणून देशाच्या अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. पण अजून या मार्गावरील साधा दगडही इकडचा तिकडे झालेला नाही. एकदा म्हणता दोनवेळा या मार्गाचा सर्व्हेही झाला आहे. आता नव्याने सर्वेक्षण होणार आहे.

जवळपास चार हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. मात्र त्यासाठी कधी भरीव तरतूद होताना दिसत नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात तर या रेल्वेमार्गासाठी अवघी एक हजार रुपयांची तरतूद करून जणू काही कोल्हापूरकरांची चेष्टाच केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाला वर्षाकाठी जवळपास 25 हजार कोटी रुपयांचा महसूल देणार्‍या या जिल्ह्याची आजपर्यंत अनेक बाबतीत अशी उपेक्षाच झाली आहे.

नेत्यांची उदासीनता!

या जिल्ह्याची अशा पद्धतीने उपेक्षा होण्याची कारणे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेत दडली आहेत. कोकण रेल्वेसाठी तिथल्या नेत्यांनी जशी धमक दाखविली, तशी धमक इथले नेते दाखवूच शकलेले नाहीत. आपापल्या संस्था, संघटना, राजकीय शह-काटशह, डाव-प्रतिडाव, जय-पराजय यातच इथली नेतेमंडळी गुरफटून गेलेली दिसत आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाचे या मंडळींना काही देणे-घेणे आहे की नाही, असा प्रश्न काहीवेळा पडल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेनेच आता कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासाठी एल्गार पुकारण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे महत्त्व!

कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वेमार्ग केवळ कोल्हापूरसाठी महत्त्वाचा नाही; तर अख्खा महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकच्या द़ृष्टीने हा रेल्वेमार्ग वरदान ठरणार आहे. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे या रेल्वेमार्गामुळे थेट कोकणाला जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकातील बेळगाव, गुलबर्गा आणि बल्लारी हे तीन जिल्हेही कोकणाला जोडले जाणार आहेत. कोकणातील आंबा विदर्भात आणि विदर्भातील संत्री थेट कोकणात येतील. पश्चिम महाराष्ट्रातील साखरेच्या निर्यातीला नवा सागरी मार्ग उपलब्ध होईल. कोकणातील होऊ घातलेली रिफायनरी विचारात घेतली तर हा रेल्वेमार्ग अनेक भागाच्या द़ृष्टीने विकासाची कवाडे खुली करणारा ठरणार आहे. त्यामुळे तातडीने हा मार्ग होण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news