कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे पाणी नियंत्रित करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या 'एमआरडीपी' या प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 4 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चार हजार कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रणाची कामे, उड्डाणपूल बांधणे, भूस्खलन उपाययोजना, वीजवाहक तारा स्थलांतरित करणे, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे खरेदी करणे, पूर संरक्षक उपाययोजना आदी कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये 70 टक्के हिस्सा जागतिक बँकेचा असून, 30 टक्के योगदान राज्य शासनाचे असणार आहे.
दुसर्या टप्प्यात महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंगळवार, दि. 13 फेब—ुवारीला सकाळी 11 वाजता मुंबई येथे मित्रा संस्था कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह देसाई, जागतिक बँकेचे प्रतिनिधी व संबंधित विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक पार पडणार आहे.
संभाजीनगरात जाऊन दानवे यांचा पर्दाफाश करू
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा येत्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन पर्दाफाश करू, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.
अनेक गावांना बसतो महापुराचा फटका
कोल्हापूर, इचलकरंजी, शहरांसह करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांतील अनेक गावांना महापुराचा विळखा पडत पडतो. पुरामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांचे अतोनात नुकसान होते. त्याचबरोबर महापुराने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग काही दिवस बंद राहतो. निम्म्याहून अधिक शहर ठप्प होते. महापूर नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र क्लायमेट रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास आवश्यक निधीस जागतिक बँकेने मंजुरी दिल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.