कोल्‍हापूर ; अकिवाट-मजरेवाडीत गायरान जमिनीवरील ऊस, हत्ती गवतावर प्रशासनाचा जेसीबी; शेतकऱ्यांना अश्रू अनावर

गायरान जमिनी
गायरान जमिनी

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा अकिवाट येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ताब्यात घेण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. मजरेवाडी-अकिवाट रस्त्यावरील विशाल आवटी यांच्या शेताच्या सीमेपासून जे.सी.बीने गायरान गट क्र.926 हद्दीत चर मारून जमीन ताब्यात घेतली. ऊस पीक आणि हत्ती गवतावर प्रशासनाने जेसीबी फिरवून जमीन ताब्यात घेत असताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान शामराव पाटील, बाळासाहेब किनिंगे, आप्पासाहेब गावडे, शंकर शिंदे, बाळासाहेब पाटील, आण्णासाहेब किनिंगे, बाबासाहेब बेरड, अप्पू किनिंगे, अन्नू किनिंगे यांच्या शेतीलगत असणारी सर्व शेतीची अतिक्रमणे चर मारून ताब्यात घेतली.

शिरोळ तालुक्यातील अकीवाट आणि सैनिक टाकळीच्या गायरान जमिनीवर असणाऱ्या 17 हेक्टर शेतीची अतिक्रमणे हटवून त्या ठिकाणी नियोजित औद्योगिक वसाहती उभी करण्यात येणार आहे. वरिष्ठ प्रशासनाच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी शंकर कवितके,तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ, नगर भूमी अधीक्षक प्रियांका मेंडक, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळ, मंडळ अधिकारी चंद्रकांत काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहिम राबविण्यात आली.

तालुका नगर भूमी अधीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने गट क्रमांक 926 च्या निश्चित केलेल्या हद्दीपासून जे.सी.बी ने चर मारण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी अधिकार्‍यांना शेतजमिनी बाबत असणारे उतारे व कागदपत्रे दाखवली असता, आपण योग्य त्या न्यायालयात दाद मागा यावेळी शासकीय कामात अडथळा निर्माण करू नका असे ग्रामविकास अधिकारी निर्मळ यांनी ठणकावून सांगितले.

अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, विजय घाटगे यांनी राखीव पोलीस दलाचे कुमक मागवले असून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. सायंकाळपर्यंत होस्कल्ले यांच्या शेतालगत पर्यंतची अतिक्रमणे ताब्यात घेणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी निर्मळ यांनी दिली.

अकिवाट गायरान जमिनीच्या हद्दीपासून अतिक्रमणे ताब्यात घेतल्यानंतर आज (बुधवार) सकाळपासून सैनिक टाकळी येथील अतिक्रमणे ताब्यात घेण्याच्या कारवाईला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news