सरवडे : पुढारी वृत्तसेवा – समाजकारण आणि राजकारण करत असताना आपण नेहमी पक्ष वाढ आणि बळकटीसाठी कष्ट केले. सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशी पात्र ठेवून नेहमी पक्षासोबत रात्रंदिवस राबलो. शेवटी हसन मुश्रीफ आणि के पी पाटील यांनी मला विधानसभा, बिद्री कारखान्याचे अध्यक्ष पदाचा शब्द देत नेहमी फसवले. राजकारण संपविण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे राधानगरी-भुदरगड तालुक्याच्या विकासासाठी स्वाभिमानी जनता आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी विधानसभा लढवणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी केले.
सोळांकूर (ता. राधानगरी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राधानगरी, भुदरगडच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, बिद्रीत झालेल्या पराभवात पाठीशी न राहता ज्यांना ज्यांना आतापर्यंत स्वार्थाचा विचार न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमी पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना, बाजार समिती, 'गोकुळ'सारखी पदे दिली. त्यांना मोठे केले. मात्र तेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले, हे मोठे दुःख आहे. मात्र या लोकांना जनता माफ करणार नाही. तसेच स्वाभिमानी जनता आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी विधानसभा लढणारचं.
यावेळी शिवाजी पाटील, नेताजीराव पाटील, प्रकाश पवार, राजू कवडे ,मानसिग पाटील महादेव कोथळकर. नंदूभाऊ पाटील ,विलास हळदे ,नामदेव मुसळे या आणि अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी आर वाय पाटील, वाय डी पाटील, डी. बी .पाटील, भगवान पातले, बबन जाधव, मोहन पाटील, सोनु आरडे, के डी चौगले, दीपक पाटील, अमर पाटील, विजय तौदकर, युवराज पाटील, सुरेश पाटील, बाळासो धोंड आदींसह राधानगरी, भुदरगड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराव इंगळे यांनी स्वागत तर संग्राम कदम यांनी आभार मानले.
सत्तेचा गैरवापर करीत बिद्रीचे अध्यक्ष के पी पाटील यांनी आमच्या कार्यकर्त्यांना फोडत आहेत. अनेकांना वेगवेगळी नोकरभरती, पदे अशी खोटी आश्वासने देवून झुलवत आहेत. मात्र अशा फसलेल्या कार्यकर्त्यांना के पी पाटील यांनी दिलेला शब्द पाळला नसल्यास मोठी नाराजी निर्माण होणार आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत के पी पाटील यांनी केवळ मते मिळविण्यासाठी बिद्री साखर कारखान्यामध्ये ९० दिवसाच्या आत नोकरी भरती करणार, असे आश्वासन दिले होते. त्यामध्ये साठ दिवस पूर्ण झाले आहेत. तरी देखील नोकर भरतीच्या कोणत्याच हालचाली चालू दिसत नाहीत. के पी यांनी नोकर भरती करून लोकांना दिलेला शब्द पाळावा.