कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महायुतीचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. कोल्हापूर व हातकणंगलेच्या जागेवरून शिंदे शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. कोल्हापूरमधून समरजित घाटगे यांचे नाव आघाडीवर आहे, तर हातकणंगलेमधून शौमिका महाडिक, संजय पाटील-यड्रावकर, संजय पाटील यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, संजय मंडलिक व धैर्यशील माने या विद्यमान खासदारांच्या नावाला नेत्यांनी पसंती दिली असून, महायुतीचे जागावाटप जाहीर होईल तेव्हा ही नावे जाहीर होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागा शिवसेनेकडे असून तेथील दोन्ही खासदार हे सध्या शिंदे शिवसेनेत आहेत. निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा हवाला देत या दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीबाबत काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासमवेत असलेल्या 13 खासदारांना उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द दिला आहे. त्याचा हवाला देत संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या समर्थकांनी त्यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणाच बाकी असल्याचा दावा केला आहे. मात्र, भाजपने कोल्हापूर व हातकणंगले यापैकी एक आपल्याला हवी ही भूमिका कायम ठेवली आहे. यातूनच समरजित घाटने यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी द्यायची व हातकणंगले मतदारसंघातून भाजपचा उमेदवार देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचे नाव निश्चित मानले जात आहे, तर हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देण्याच्या विचारात आहे.