चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
राज्यातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम जिल्ह्या-जिल्ह्यांत झाला आहे. आता येणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या बदललेल्या राजकीय भूमिका सहकारी संस्थांसाठी अडचणीच्या ठरणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणार्या नेत्यांमध्ये पडलेली फूट काय काय परिणाम करते, हे निवडणुकीनंतर दिसेल.
जिल्ह्यातील सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकेकाळी मनपा म्हणजेच महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील व अरुण नरके यांचे वर्चस्व होते. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या जेथून हलतात ते गोकुळ आणि जिल्हा बँक, कोल्हापूर बाजार समिती यासह अनेक नगरपालिका, पंचायत समित्यांवर 'मनपा' युतीचे वर्चस्व होते. स्थानिक संस्थांच्या या बळावर महादेवराव महाडिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून अनेक वर्षे प्रतिनिधित्व करीत होते. या 'मनपा' युतीला हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे यांनी तगडे आव्हान दिले. महाडिक यांचे वर्चस्व असूनही ताराराणी आघाडीला शह देत विरोधकांनी दोन वेळा महापौरपदासाठी बिन आवाजाचा बॉम्ब फोडला. सत्ता आपल्या डाव्या हाताचा मळ आहे, असे म्हणणार्या महाडिक यांना हा धक्का होता.
आघाडीच्या राजकारणाचा पाडाव करण्यासाठी पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविण्याची मोहीम सतेज पाटील यांनी सुरू केली. हसन मुश्रीफ, विनय कोरे यांच्यासमवेत आघाडी केली. उमेदवार पाहून त्यांच्यावर ताकद लावायची आणि निवडून आल्यावर प्रत्येकाला आपल्या आघाडीचा टिळा लावायचा, हे राजकारण बंद झाले. तेथेच महाडिक यांच्या राजकारणाला पहिला शह बसला. एकापाठोपाठ एक संस्था त्यांच्या हातून निघून गेल्या. विधान परिषद, लोकसभा आणि विधानसभेला महाडिक यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, राजाराम कारखाना आणि राज्यसभेच्या निवडणुकीत महाडिक यांनी मारलेली बाजी त्यांचे राजकीय पुनर्वसन करणारी ठरली आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या अशा संस्थाही त्यांनी गमावल्या. केवळ गोकुळ हा जिल्ह्याचा बलाढ्य आर्थिक गड त्यांच्या ताब्यात राहिला होता. तोही गड सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे यांनी खालसा करून तेथे आपला झेंडा लावला.
सत्ताबदल झाला. मात्र, राज्यातील राजकारणाच्या बदलाने जिल्ह्याचे राजकीय समीकरणच बिघडले. विनय कोरे राजकारणात भाजपबरोबर असले, तरी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणात ते सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राहिले. राजाराम कारखाना त्याला अपवाद ठरला. संस्थांवर वर्चस्व मिळविताना एकत्र असलेले सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या राजकीय वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत.
गोकुळ आणि जिल्हा बँकेत हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची सत्ता आहे. महाडिक यांची सत्ता त्यांनी खेचून घेतली. त्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेतली. तेव्हा मुश्रीफ तटस्थ राहिले. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना ही तटस्थता सोडून द्यावी लागेल. तेथे मुश्रीफ, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची कसोटी आहे. कारण नेतृत्व करणार्या दोन नेत्यांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या झाल्या आहेत. यातून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गोकुळवर दबाव वाढणार आहे. गोकुळ हा बलाढ्य आर्थिक गड आहे. त्यामुळे नेमके कोणाचे ऐकायचे, असा प्रश्न समोर आहे. जिल्हा बँकेत मुश्रीफ यांचा एकहाती कारभार असला, तरी तेथेही दबावाचे राजकारण होणार, यात शंका नाही. त्यामुळे नेत्यांनी बदललेल्या राजकीय भूमिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सहकारी संस्थांची कसोटी लागणार आहे. केवळ गोकुळ आणि जिल्हा बँकच नव्हे; तर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्येही राजकीय वादाचे वावटळ उठल्याशिवाय राहणार नाही…
गोकुळ वार्षिक उलाढाल – 3 हजार 428 कोटी रुपये
दूध उत्पादकांना मिळणारी रक्कम – 2 हजार 914 कोटी रुपये
जिल्हा बँक वार्षिक उलाढाल – 13 हजार कोटी रुपये
ठेवी – 9 हजार कोटी
29 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोकुळ दूध संघाला सदिच्छा भेट देणार आहेत. गोकुळच्या एमआयडीसीच्या प्रकल्पावर अजित पवार सुमारे तासभर असणार आहेत. गोकुळमध्ये महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांची सत्ता होती. पण मुश्रीफ यांच्या राजकीय निर्णयाने आता या सत्तेत महायुतीचा समावेश झाला आहे. एकाकी लढत देणार्या शौमिका महाडिक यांना मुश्रीफ यांच्या राजकीय भूमिकेने बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.
एकेकाळी महाडिकांना विरोध करणारे मुश्रीफ हे महाडिक यांच्या बुलेटवर बसले आणि राजकारण बदलले आहे, असा संदेश त्यांनी दिला. आता राजकारणात हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, विनय कोरे, राजेश पाटील, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, समरजितसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील हे परस्परांवर टीका करणारे नेते आता एकत्र आले आहेत. दुसरीकडे सतेज पाटील, पी. एन. पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर, व्ही. बी. पाटील, राजूबाबा आवळे, संजय घाटगे, संजय पवार आदी मंडळी एकत्र आहेत.