Shree Dutt Janmotsav दिगंबरा… दिगंबराच्या जयघोषात नृसिंहवाडी दुमदुमली

श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी
श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Published on
Updated on


नृसिंहवाडी : वाट वळणाची जीवाला या ओढी…दिसते समोर नरसोबाची वाडी… हीच आस मनात धरून लाखो भाविकांनी आज (दि.२६) सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सवाची पर्वणी साधली. श्री गुरुदेव दत्त जय जयकारात दत्त नगरी दुमदुमुन गेली. पाच वाजता जन्मकाळ झाल्यानंतर अभिर पुष्पवृष्टी उधळण्यात भाविक नागरिक तसेच अबालबुद्ध रंगून गेले होते.  Shree Dutt Janmotsav

आज सायंकाळी जन्मकाळ असला तरी सकाळपासूनच दत्त मंदिराकडे हजारो भाविकांनी कूच केली होती. दुपारी मंदिर घाटावर दत्त दर्शनासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. दक्षिण घाटावर दत्त देवस्थान समितीने रांगेचे नियोजन केले होते. दत्त मंदिरापासून मंगलम परिसर सभागृहापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिराच्या दोन्ही बाजूस शामियाने असल्यामुळे हजारो भाविकांना सुलभ दर्शन तसेच विश्रांती घेणे सोयीचे झाले. दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरण कमलावर महापूजा करून त्रय मूर्तीची रेखीव पान पूजा बांधण्यात आली. साडेचार वाजता हरी कीर्तनास प्रारंभ झाला. पाच वाजण्याची जन्म काळाची वेळ जशी जवळ येईल, तशी भाविकांची उत्सुकता वाढत गेली. Shree Dutt Janmotsav

दिगंबरा दिगंबरा, अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, जयघोषात मंदिरात श्रींच्या उत्सव मूर्ती समवेत जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांची उपस्थिती होती. मंदिरात पाळण्याचे पठण झाल्यानंतर आरती होऊन सुंठवडा प्रसादाचे वाटप उपस्थितांना करण्यात आले. जन्मकाळ झाल्यानंतर पाळणा मानकरी वासुदेव उर्फ अजित पुजारी यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आला. मंदिरात उशिरा पालखी शेजारती असे कार्यक्रम संपन्न झाले.

मंदिरात जाण्या येण्यासाठी दुहेरी वाहतुकीचे नियोजन केले होते. पोलिसांचा बंदोबस्त होता. राज्यासह, कर्नाटकातून जादा बसेस सोडल्या होत्या. घाटावर पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लाखो भाविक बसेसशिवाय खासगी वाहन, दुचाकीने आले होते. वेगवेगळ्या मार्गाने दत्त मंदिरात भाविकांना प्रवेश दिल्यामुळे गर्दी विरळ होण्यास मदत झाली. देवस्थानच्या परिसरात पोलीस, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक, रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मी यांनी गर्दी सुरळीत करण्यास मोठी मदत केली.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे, चिटणीस विवेक हावळे, सर्व विश्वस्त, कर्मचारी, ग्रामसेवक बी. एन. टोणे, ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते.

Shree Dutt Janmotsav : ३० ते ४० हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद

दत्त जयंती निमित्त आज दिवसभरात अन्नछत्रात सुमारे ३० ते ४० हजार भाविकांनी लाभ घेतला. येथील स्वामी समर्थ केंद्रात दर्शन आणि प्रसादासाठी मोठी गर्दी झाली होती. औदुंबरा तटी नृसिंह योगी परमशांती सुखासी भोगी सुखासी, अशी प्रचिती दत्त जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमामुळे सर्वांना आली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news