kolhapur news | कागलचा कोंढाणा परत घेणार, समरजित घाटगेंचे मुश्रीफांना आव्हान

kolhapur news | कागलचा कोंढाणा परत घेणार, समरजित घाटगेंचे मुश्रीफांना आव्हान
Published on
Updated on

कागल, पुढारी वृत्तसेवा : हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर नाराज झालेले भाजपचे नेते आणि जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज गुरुवारी कागल (जि. कोल्हापूर) येथे आपली भूमिका स्पष्ट केली. मी भाजप सोबतच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी कागल येथील ज्युनिअर सरकार वाडा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. (kolhapur news)

मला फडणवीस यांनी मेसेज केला. त्यांना मी भेटलो. त्यांच्याशी तासभर बोललो. मला जे काही विचारायचं होते ते विचारले. मी काही मागायला गेलो नाही. माझं पुनवर्सन करायला गेलो नाही, असेही घाटगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे माझे गुरु आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ सोडणार नाही. अनेकांनी यापूर्वी अनेकवेळा गुरु बदलले. मात्र मी बदलणार नाही. माझ्या रक्तामध्ये गुरुनिष्ठा आहे. स्वराज्याचा भगवा कागलमध्ये फडकवणार आहे. मोठ्या फरकाने निवडून येईन. आजचा मेळावा म्हणजे विजयाचं भूमिपूजन आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये सव्वा तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील सांगणार नाही. त्यांच्याशी मला जे काय बोलायचे होते ते बोललो आहे.

मी गप्प बसल्यानंतर राज्यभर माझी बातमी झाली. कागलकडे राज्याचे लक्ष लागले. गेल्या निवडणुकीमध्ये ९० हजार मते पडली होती. आता मोठ्या फरकाने निवडून येईन. जनतेने मला साथ द्यावी. कागलचा कोंढाणा परत घेणार आहे. कार्यकर्त्यांनी झोपू नये आणि विरोधकांना झोपू देऊ नये. छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. शाहू महाराजांची जन्मभूमी मला कर्मभूमी करायची आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रास्ताविक भैया इंगळे यांनी केले. यावेळी राजेंद्र तारळे, शकिला शानेदिवान, माजी जि. प. सदस्य अनिता चौगुले, शर्मिष्ठा कागलकर, रमेश माळी यांची भाषणे झाली. बाबासाहेब पाटील, नवोदिता घाटगे, अखिलेशसिंह घाटगे, श्रेया देवी घाटगे, एम पी पाटील, विरेंद्रसिंह घाटगे व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक समरजितसिंह घाटगे नाराज होते. कोणाशी त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली असून गुरुवारी (दि. ६) सकाळी दहा वाजता येथील ज्युनिअर सरकार वाड्यात कार्यकर्त्यांना भेटून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तशा आशयाचा व्हिडीओ बुधवारी त्यांनी सोशल मीडियावर पाठविला होता. (kolhapur news)

घाटगे व त्यांच्या समर्थकांत नाराजी

मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे कागल तालुक्यातील दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात गेली काही दिवस टोकाची भूमिका घेऊन राजकारण करत आहेत. आरोप प्रत्यारोप करत आहेत. सध्याच्या बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिका आता नव्याने व्यक्त होत आहेत. घाटगे आणि मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष गेले दोन-तीन वर्षे टोकाला गेलेला असताना त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे घाटगे व त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news