कोल्हपूर/दोनवडे/कोपार्डे : पुढारी वृत्तसेवा : बालिंगा येथील सशस्त्र दरोडाप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पोलिसांनी तपासाची सूत्रे त्याच्यावर केंद्रित केली आहेत. दरम्यान, दरोडेखोरांनी वापरलेल्या दोन दुचाकी घटनास्थळापासून सात किलोमीटर अंतरावर शेतवडीत सोडल्या होत्या. त्या करवीर पोलिसांनी शुक्रवारी जप्त केल्या. या दुचाकी चार ते पाच दिवसांपूर्वी जुना राजवाडा व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासातून समोर आले आहे.
बालिंगा फाट्यावरील कात्यायनी ज्वेलर्स या दुकानावर गुरुवारी दुपारी चौघा संशयितांनी सशस्त्र दरोडा घालून दोन कोटींचा ऐवज लुटला. दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले. पाठलाग करणार्या ग्रामस्थांच्या दिशेने गोळीबार करत हे दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, शुक्रवारी गुन्ह्यातील दोन वाहने यवलूज येथील नागरिका स्पिनिंग मिलजवळून खुपीरे गावाकडे जाणार्या पाणंद रस्त्यावर मिळाली.
पाच दिवसांपूर्वी दुचाकींची चोरी
गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकींपैकी एक जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तर दुसरी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुन्ह्याच्या चार ते पाच दिवसांपूर्वी चोरीस गेल्या होत्या. दोन्हीही दुचाकी चांगल्या स्थितीतील असल्याचे पाहूनच चोरी केल्याचे दिसून येते.
निर्जन स्थळाची यापूर्वीच रेकी?
यवलूज ते खुपीरे हा पाणंद रस्ता निर्जन आहे. या मुख्य पाणंदीपासून 500 मीटर अंतरावर शेतामध्ये संशयितांनी दोन्ही दुचाकी उभ्या केल्या होत्या. हा मार्ग निर्जन असल्याने संशयितांनी या ठिकाणांची यापूर्वी रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
स्थानिक शिव्यांचा वापर
दरोडा घालताना झालेल्या झटापटीवेळी तसेच जमावावर गोळीबार करून पळून जाताना संशयितांनी स्थानिक भाषेतील शिव्या दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावरून संशयित स्थानिक असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज हाती
बालिंगा फाटा, यवलूज फाटा, नागरिका स्पिनिंग मिल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तपासासाठी करवीर पोलिसांची दोन तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथकेही तपास करीत आहेत.
जखमींवर उपचार सुरू
दुकानाचे मालक रमेश माळी व त्यांचे मेहुणे जितू माळी यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी श्वान बेलीने दाखवला मार्ग
घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. बेली या श्वानाने कात्यायनी ज्वेलर्सपासून ओम ज्वेलर्सच्या दुकानापर्यंत मार्ग दाखवला. येथून श्वान परत फिरले.
मालक राजस्थानी; अन् दरोडेखोरांच्या कानात बाली
कात्यायनी ज्वेलर्सचे मालक रमेश यांचे मूळ गाव राजस्थान येथील आहे. दरोडेखोर हे 30 ते 40 वयोगटातील आहेत. राजस्थानमध्ये मुले कानात बाली घालतात, तशी बाली दरोडेखोरांच्या कानात होती.