शाहूवाडी-पन्हाळ्यात गटनेत्यांपुढे धर्मसंकट!

शाहूवाडी-पन्हाळ्यात गटनेत्यांपुढे धर्मसंकट!
Published on
Updated on

सरूड : शाहूवाडीचे माजी आ. सत्यजित पाटील सरुडकर यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (यूबीटी) पक्षाची उमेदवारी मिळाल्यामुळे येथे गटनेत्यांपुढे राजकीय धर्मसंकट उभे राहिले आहे. राजकीय कुरुक्षेत्रात एकमेकांचा पाडाव करण्यासाठी दंड थोपटणार्‍यांवर गळ्यात गळा घालण्याची, तर खांद्याला खांदा लावून साथ देणार्‍यांवर परस्पर विरोधात उभे ठाकण्याची वेळ आली आहे.

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात गटांच्या राजकारणाचा बोलबाला आहे. आ. विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष असला तरीही कार्यकर्त्यांना कोरे गट म्हणूनच ओळखले जाते. शाहूवाडीत शिवसेना (यूबीटी) माजी आ. सरूडकर यांचा गट आणि जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड आणि त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा गट यांच्यात 15 वर्षांची राजकीय युती आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे सरूडकरांचे पन्हाळा तालुक्यातील जुने कट्टर समर्थक आहेत.

दुसर्‍या बाजूला शाहूवाडी काँग्रेस नेते आणि गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांचा गट, पन्हाळ्याचे काँग्रेस नेते, गोकुळ संचालक, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अमरसिंह पाटील यांचा आमदार कोरे यांच्याशी असणारा दोस्तानाही जगजाहीर आहे. सत्तेच्या सारीपाटावर विळ्या-भोपळ्याचे सख्य जपणारे हे परस्परविरोधी तुल्यबळ गटनेते लोकसभेच्या व्यासपीठाची अदलाबदल स्वीकारतात का, हे पाहणे रोचक ठरेल. भाजप बूथ कमिट्यांपुरता मर्यादित आहे. तीच अवस्था शिवसेना शिंदे गटाची आहे. इथला सुप्त मोदी फॅक्टर मदतीला येईल, आ. कोरे यांच्या नेटवर्कचा माने यांना फायदा हाईल, अशी खा. धैर्यशील माने समर्थकांना आशा वाटते.

कर्णसिंह आणि अमरसिंह या काँग्रेस नेत्यांनी 'मविआ'च्या बैठकीत हजेरी लावली. आ. सतेज पाटील यांचे पुढील निर्देश या दोघांनाही शिरसावंद्य असतील. गोकुळच्या राजकारणात दुरावा आलेले सत्यजित आणि सतेज पाटील या पै-पाहुण्यांमध्ये पुन्हा जवळीक होईल, अशी अपेक्षा आहे. मानसिंगराव गायकवाड, बाबासाहेब आसुर्लेकर यांनाही धर्मसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यांना युती धर्म म्हणून मानेंचे व्यासपीठ शेअर करावे लागणार आहे. धैर्यशील मानेंना संसदेत जाण्यासाठी हात देणारे सत्यजित पाटील हेच आता त्यांच्या विरोधात आहेत. राजू शेट्टी यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. शेट्टी यांचा वेगळा असा गट किंवा स्थानिक मोठा नेता सध्या तरी त्यांच्यासोबत नसला तरी स्वाभिमानी पक्षाला मानणारे कार्यकर्ते यांच्यावरच त्यांची भिस्त आहे. तसेच सामान्य मतदार आणि शेतकरी त्यांना किती साथ देणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news