जिकडं भेळ तिकडं खेळ करणार्‍या खासदार मंडलिकांना जागा दाखवा : सुषमा अंधारे

जिकडं भेळ तिकडं खेळ करणार्‍या खासदार मंडलिकांना जागा दाखवा : सुषमा अंधारे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एकदा विकलेला माल दुकानदार परत घेत नाही, त्यामुळे एकदा विकलेल्या खासदाराला तुम्ही पुन्हा स्वीकारणार आहात काय, असा सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्वार्थी असलेल्या आणि जिकडं भेळ तिकडं खेळ करणार्‍या खासदार संजय मंडलिक यांना त्यांची जागा दाखवा, असा घणाघात केला. संविधान बदलावयास निघालेले हात रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ सदरबाजार, विचारमाळ येथे गुरुवारी आयोजित सभेत अंधारे बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, पाच वर्षांत मंडलिक यांना काम करायला वेळ मिळाला नाही. बारा वाजेपर्यंत उठत नाहीत आणि नंतर ते भेटत नाहीत. मंडलिक असतील किंवा धनंजय महाडिक असतील सोयीनुसार स्वार्थासाठी पक्ष बदलणारे आपले काय काम करणार आहेत? दुसर्‍यांना बेंटेक्स म्हणून हिनवणार्‍या मंडलिक यांनी काही दिवसांतच एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागून जात आपणही बेंटेक्स असल्याचे दाखवून दिले. ज्यांनी पद, प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणारा खासदार तुमच्याशी कसा प्रामाणिक राहील? संविधान बदलणारे हात रोखण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या.

यावेळी आमदार जयश्री जाधव, अतुल दिघे, राजाराम धनवडे, अशोक भंडारे, सतीशचंद्र कांबळे, संदीप देसाई, राजेश लाटकर, रूपाताई वायदंडे आदींची भाषणे झाली. सभेस तौफिक मुल्लाणी, हर्षल सुर्वे, सरलाताई पाटील, भारती पोवार, स्मिता मांढरे, स्मिता सावंत, महेश जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले.

आता बोलून काय उपयोग

उपस्थितांमधून मंडलिकांवर बोला, असा आग्रह धरण्यात येत होता. यावर अंधारे म्हणाल्या, ज्यांना बारा वाजण्यापूर्वीचे समजत नसेल आणि सायंकाळी सहानंतरचे कळत नसेल, तर त्यावर आता रात्री बोलून काय उपयोग?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news