कोल्हापूरला आता वेध स्थानिक फुटबॉल हंगामाचे…

कोल्हापूरला आता वेध स्थानिक फुटबॉल हंगामाचे…

Published on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तब्बल महिनाभर सुरू असणार्‍या वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेची सांगता रविवारी झाली. यामुळे फुटबॉलवेड्या कोल्हापूरला आता वेध लागले आहेत ते स्थानिक फुटबॉल हंगामाचे.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या (केएसए) शाहू छत्रपती लीग स्पर्धेचे दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता, फुलेवाडी क्रीडा मंडळविरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात, तर दुपारी 4 वाजता, शिवाजी तरुण मंडळविरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात उद्घाटनाचे सामने होणार आहेत.

मेस्सीला गुलालाचा नाम लक्षवेधी

कतारमधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील तीन तासांच्या थरारक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या विजयानंतर फुटबॉलवेड्या कोल्हापुरात पारंपरिक वाद्यांसह नेत्रदीपक आतषबाजीत हजारो फुटबॉल शौकिनांनी प्रचंड जल्लोष केला. काही तरुणांनी मिरजकर तिकटी येथील मेस्सीच्या भव्य कटआऊटवर चढून आतषबाजी केली. इतकेच नव्हे, तर मेस्सीच्या कपाळावर गुलालाचा नाम ओढून गळ्यात फुलांचा हारही घातला.

कतारमध्ये कोल्हापूरच्या संघांचे किट

कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमी वडगावकर कुटुंबीयांनी कतारमधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी स्थानिक 16 वरिष्ठ फुटबॉल संघांचे विविध रंगांतील किट व तालीम-मंडळांचे नाव लिहिलेले ध्वज घेऊन मैदानात जाण्याची तयारी केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने त्यांना या वस्तू नेण्यास नकार दिला. यामुळे वडगावकर कुटुंबीयांनी स्टेडियमच्या बाहेर 16 वरिष्ठ संघांचे किट व ध्वजासह व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला.

अर्जेंटिनाच्या विजयाबद्दल मोफत नोटरी

अर्जेंटिनाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल अवचितपीर तालीम, शिवाजी पेठेतील फुटबॉलप्रेमी अ‍ॅड. योगेश साळोखे यांच्या वतीने मोफत नोटरी कागदपत्रे करून देण्याचे जाहीर केले आहे. सोमवारी 16 लोकांनी याचा लाभ घेतला. आणखी लोकांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी मोफत नोटरीचा कालावधी आणखी एका दिवसासाठी वाढविण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news