कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ढिसाळ व्यवस्थापन आणि संशयास्पद कारभाराने वादग्रस्त ठरलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बहुचर्चित मोबाईलप्रकरणी गृहखात्याने दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. उच्चस्तरीय चौकशीत दोषी आढळलेल्या कारागृहातील दोन वरिष्ठांसह 9 कर्मचारी अशा 11 जणांवर कर्तव्यातील हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह प्रशासन) अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार दोन वरिष्ठ तुरुंगाधिकार्यांसह 11 जणांना बडतर्फ करण्यात आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. आणखी काही अधिकारी, कर्मचारी कारवाईच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बडतर्फ झालेल्यात कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के, सतीश कदम, कर्मचारी तानाजी गायकवाड, रवी पवार, वैभव पाटील, अनिकेत आल्हाट, वैशाली पाटील, सुहास वरखडे, संजय टिपुगडे, स्वप्नील हांडे यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी दोन अधिकार्यांसह पाच कर्मचार्यांची वरिष्ठस्तरावर चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी ठरल्यास संबंधित कारवाईच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले. कळंबा कारागृहातील दोन वरिष्ठ अधिकार्यांसह 11 जणांना एकाच वेळी बडतर्फ करण्यात आल्याने अधिकारी, कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे.
दोन प्रभारी अधिकार्यांच्या पुणे, सोलापूरला तडकाफडकी बदल्या
कळंबा कारागृहाचे तत्कालीन प्रभारी अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची पुणे येथील येरवडा येथे तर उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. भुसारे व आडे हे अधिकारी अधीक्षक दर्जाचे असल्याने त्याच्यावरील कारवाईचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. संबंधितांवर राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई होऊ शकते, असेही वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.
दररोज तीन सत्रांत झडती; 25 दिवसांत सापडले 80 मोबाईल
कळंबा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांकडे मोबाईल, बॅटर्यासह चार्जर तसेच वारंवार गांजाचा पुरवठा होत असल्याने कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत वरिष्ठाधिकार्यांसह 15 जणांचे विशेष पथक नियुक्त केले होते. पथकाने 30 मार्चपासून दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन सत्रांत कारागृहातील कैद्यांची झडती घेतली. बरॅकची तपासणी केली असता 25 दिवसांत 80 पेक्षा अधिक मोबाईल संच, सिमकार्ड, चार्जर अशा संशयास्पद वस्तू विशेष पथकाच्या हाताला लागल्या. प्रशासनाच्या वतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्यादीही दाखल करण्यात आल्या होत्या.
कडेकोट सुरक्षा, भक्कम तटबंदीला सुरूंग
एकेकाळी कडेकोट सुरक्षा यंत्रणा आणि भक्कम तटबंदी असलेल्या कळंबा कारागृहात एकाच महिन्यात मोठ्या संख्येने मोबाईल संच, सिमकार्ड सापडल्याने गृहखात्याने या कृत्याची गंभीर दखल घेतली होती. अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे यांना चौकशीचे आदेश दिले होते. मोबाईल प्रकरणाच्या चौकशीत दोन वरिष्ठ अधिकार्यांसह 11 कर्मचारी दोषी ठरल्याने उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बडतर्फीची कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
कळंबा जेलमधील काळेबेरे दै. 'पुढारी'ने केले उघड
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील प्रशासन यंत्रणेच्या संशयास्पद कारभाराचा दै. 'पुढारी' ने सातत्याने पर्दाफाश करून गृहखात्याचे लक्ष वेधून घेतले होते. अवघ्या महिन्यात पाच, दहा नव्हे, तर तब्बल 80 मोबाईलसह संशयास्पद वस्तू सापडल्यामुळे यंत्रणेचा भोंगळपणा उघड झाला होता. 'कळंबा जेलच्या भिंतींना भ्रष्टाचाराचे भगदाड' या बातमीने अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे लक्ष वेधले होते.