कोल्हापूरच्या हवेला ‘ओझोन’चे ग्रहण

कोल्हापूरच्या हवेला ‘ओझोन’चे ग्रहण

कोल्हापूर : देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. हवेमध्ये वाढलेल्या अतिसूक्ष्म व श्वसनीय धुलिकणांमुळे दिवसागणिक कोल्हापूरच्या हवेची गुणवत्ता ढासळतच चालली आहे. अशात आता प्रदूषणाची राजधानी असलेल्या दिल्लीप्रमाणेच कोल्हापुरातही ओझोन प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहरातील हवेत ओझोनचे प्रमाण वाढले असून याचा आघात थेट मानवी आरोग्यावर होण्याचा धोका आहे.

यामुळे प्रशासनाने हवा प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ कागदी घोडे न नाचवता ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. पृथ्वीच्या वायुमंडलात 10 कि.मी. ते 50 कि.मी.मध्ये ओझोन गॅसचा थर असतो. हा ओझोनचा थर सूर्यापासून येणार्‍या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो. मात्र वायुमंडलात राहून आपले संरक्षण करणारा थर जमिनीवर आल्यास गंभीर प्रदूषण मानले जाते. यामुळे हवा आणखी प्रदूषित होते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार गेले चार दिवस कोल्हापूरच्या हवेमधील प्रमुख प्रदूषकांमध्ये ओझोन व पार्टिक्युलेट मॅटर 10 चा समावेश होता. रविवारी चार वाजता सिंचन भवन परिसरातील केंद्राचा हवा गुणवत्ता निर्देशांक 194 इतका होता; तर ओझोनचे सर्वाधिक प्रमाण 199 इतके होते.

उन्हाळ्यामध्ये ग्राऊंड लेव्हल ओझोनचे प्रमाण वाढते. या ओझोन प्रदूषणामुळे गेली अनेक वर्षे राजधानी दिल्लीला हैराण करून सोडले आहे. ओझोन प्रदूषणाचा इतर प्रदूषणाच्या तुलनेत अधिक घातकरीत्या मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याने ओझोन प्रदूषण जगभरामध्ये चिंतेचा विषय बनले आहे.

श्वसनाच्या आजारांचा धोका

ओझोन प्रदूषक अत्यंत घातक मानले जाते. याचा थेट आरोग्यावर परिणाम होतो. व्याधिग्रस्त तसेच रुग्णांना याचा धोका अधिक असतो. ओझोनयुक्त प्रदूषित हवेत अधिक काळ वावरल्या श्वसनमार्गाचे आजार जडण्याचा धोका उद्भवू असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news