कोल्हापूर : गांजा तस्करी टोळ्यांना दणका

कोल्हापूर : गांजा तस्करी टोळ्यांना दणका

कोल्हापूर : गांजा तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्ह्यात कारवाईची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक यांच्यासह सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट अखेर वरिष्ठ स्तरावर धडक मोहीम राबवून कारवाईचा आढावा सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 'पुडी माव्याची… विक्री गांजाची..!' या दै. 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे.

पोलिस अधीक्षक पंडित यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गांजा, मावा, गुटख्यांसह नशिल्या गोळ्यांची विक्री करणार्‍या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तस्करांविरुद्ध केवळ दिखाऊ कारवाई नको, छापा कारवाईत जेरबंद झालेल्या संशयितांच्या नावासह अमली पदार्थाचे नाव, साठा, वजन, साठ्याच्या एकूण किमतीसह दररोज होणार्‍या कारवाईचा लेखी आढावा पोलिस नियंत्रण कक्षाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

तस्करांचा धंदा पॉवर फुल्ल

स्थानिक सराईत टोळ्यांना हाताशी धरून कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांतील तस्करांनी शहर, जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वर्षभरापासून गांजासह मावा, गुटखा आणि नशिल्या गोळ्या पुरविण्याचा बिन भांडवली धंदा जोमाने चालला आहे. अलीकडच्या काळात तर कोल्हापूर शहरासह उपनगरे व ग्रामीण भागात माव्याच्या पुडीतून गांजाची बेधडक विक्री सुरू झाल्याने तस्करी टोळ्यांच्या मिळकतीचा धंदा पॉवर फुल्ल बनला आहे.

व्यसनांचे शिकार!

माव्याच्या पुडीतून थेट गांजा उपलब्ध होऊ लागल्याने 16 ते 22 वयोगटातील पोरांचा तस्कराभोवती सकाळ-सायंकाळी अक्षरश: गराडा पडू लागल्याचे विदारक चित्र शहर, जिल्ह्यात अनुभवाला येऊ लागले आहे. विशेष करून गोरगरीब घरातील कोवळी पोरं व्यसनांचे शिकार ठरू लागल्याने ही समाजाला सतावणारी मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे.

आदेशाचा कठोर अमल

या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'ने दि. 8 ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची सामाजिक संघटनांसह वरिष्ठ यंत्रणांनीही दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षक पंडित यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांना तस्करी टोळ्यांविरुद्ध विशेष कारवाई करण्याचे आदेश लागू करून निर्णयाच्या कठोर अंमलबजावणीच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थांचा बेकायदेशीर वापर, सेवन, वाहतूक आणि विक्रीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी दि. 18 ऑगस्टअखेर अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सरकारी कचेर्‍या, शाळा सभोवती हालचालीवर करडी नजर

सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयासह शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गांसह सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या हालचालीवर लक्ष केंद्रित करून तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अमली पदार्थविरोधी अभियान कठोरपणे राबविण्याचे आवाहन

पानटपरी, ठेला, फेरीवाले, गोळ्या, बिस्किटे विक्री करणार्‍या घटकांच्या हालचालीवरही करडी नजर ठेवण्याबाबत बजावण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीविरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षकांनी प्रभारी अधिकार्‍यांना लेखी सूचना द्याव्यात, असेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी आदेशात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news