कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवस ‘यलो अलर्ट’

कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवस ‘यलो अलर्ट’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यासाठी बुधवारपर्यंत तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. काही भागात सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 16.5 मि.मी. पाऊस झाला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याला वळवाचा तडाखा बसत आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस होणार आहे. बुधवार, दि. 15 नंतर मात्र वातावरण मोकळे राहील, अशीही शक्यता आहे.

शनिवारी तसेच रविवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे आज सकाळपासूनच वातावरण पावसाळी होते. अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्याने आजही पाऊस होईल, अशी शक्यता होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. दुपारी काही काळ वातावरण निरभ्र झाले. उन्हाचा काहीसा तडाखाही बसला. उद्यापासून सकाळी हवेत उष्मा राहील, दुपारनंतर मात्र जोरदार वार्‍यासह पाऊस होईल. सोमवारी (दि. 13) जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी होईल, असाही अंदाज आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 16.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक 33.2 मि.मी. पाऊस झाला. आजरा व हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी 27.4 मि.मी., चंदगड तालुक्यात 21.2 मि.मी., शिरोळ तालुक्यात 22.2 मि.मी., कागलमध्ये 22 मि.मी., राधानगरीमध्ये 16.5 मि.मी., भुदरगडमध्ये 12.1 मि.मी., करवीरमध्ये 6.8 मि.मी., पन्हाळ्यात 3.4 मि.मी., शाहूवाडीत 3.2 मि.मी., तर गगनबावड्यात 1.5 मि.मी.पाऊस झाला.

सात दिवसानंतर पारा घसरला

दरम्यान, रविवारी सरासरी तापमानापेक्षा 2.1 अंशांनी तापमानात घट झाली. गेल्या सात दिवसांपासून 37 अंशांवर पारा होता. आत त्यात घट होऊन तो रविवारी तो 33.7 अंशांपर्यंत खाली आला. किमान तापमानही 23 अंश इतके नोंदवले गेले. यामुळे हवेत गारवा होता. दरम्यान, कोल्हापूर शहरात गेल्या 24 तासांत 5 मि.मी. पावसाची नोंद झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news