कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याला 15 हजार लिटर वाईन विक्री

कोल्हापूर जिल्ह्यात महिन्याला 15 हजार लिटर वाईन विक्री

कोल्हापूर; डी. बी. चव्हाण : राज्य सरकारने सुपर मार्केटस् आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक दुकानांमध्ये वाईन विक्री करता येऊ शकणार आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे 30 पेक्षा अधिक दारूच्या दुकानांमधून वाईनची विक्री केली जाते. यातून महिन्याला सुमारे 15 हजार लिटर वाईनची विक्री होत आहे.

सध्या महाराष्ट्रात 45 वाईनरीज् आहेत. यापैकी 15 ते 20 वाईनरीज् उत्पादने बाजारपेठेत आहेत. उर्वरित वाईनरीज् केवळ वाईननिर्मितीचे काम करतात. देशभरात वाईनची जवळपास 1 हजार कोटींची बाजारपेठ आहे. यापैकी 65 टक्के वाईन उद्योग हा एकट्या महाराष्ट्रात एकवटला आहे. नाशिक हे राज्यातील वाईननिर्मितीचे प्रमुख केंद्र आहे.

याशिवाय सांगली, पुणे, सोलापूर, बुलडाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यांत वाईननिर्मितीचे कारखाने आहेत. नव्या धोरणानंतर ही विक्री 1 लाख लिटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सुपर मार्केटस् आणि जनरल स्टोअर्समध्ये विकल्या जाणार्‍या एक लिटर वाईनच्या बाटलीवर प्रत्येकी 10 रुपयांचा अबकारी कर आकारला जाणार आहे.

शासनाने सुपर मार्केटस् व किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्तपत्रात वाचले आहे; पण याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अद्यापही कोणताही आदेश प्राप्‍त झालेला नाही, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विक्री केल्या जाणार्‍या बहुतांश वाईन्समध्ये मद्याचा अंश अत्यंत कमी असतो. अनेक बेकरीज् आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वाईनचा वापर होतो. सध्याच्या घडीला केवळ मान्यताप्राप्‍त वाईन शॉपमधून वाईन विक्रीला मुभा आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे 30 दारू दुकानांमध्ये वाईन विक्री होते. या दुकानांमध्ये साडेसातशे मि.लि.च्या बाटलीस 240 रुपये असा दर आहे. बीअर शॉपी व बीअर बारमध्ये यापेक्षा अधिक रक्‍कम ग्राहकांकडून वसूल केली जाते. वाईन पिणारा ग्राहक हा वेगळा आहे.अशा ग्राहकांसाठी बीअर बार, परमीट रूममध्येही स्वतंत्र व्यवस्था केली जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news