‘पुढारी’चा आज वर्धापन दिन

‘पुढारी’चा आज वर्धापन दिन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला, वाचकांशी गेली 85 वर्षे आपुलकी आणि जिव्हाळ्याचे अतुट नाते जपलेला दैनिक 'पुढारी' सोमवारी (दि. 1) 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 'पुढारी'च्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल बागेत सायं. 5 ते 8 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.

निःपक्ष व निर्भीड विचारांचा देदीप्यमान कृतिशील वारसा जपत, वाचकांच्या भक्कम साथीने दै. 'पुढारी'ने 85 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. कोल्हापूर म्हणजे 'पुढारी' आणि 'पुढारी' म्हणजे कोल्हापूर असे समीकरण असलेल्या, कोल्हापूरकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या 'पुढारी'च्या वर्धापन दिनाचा सोहळा म्हणजे कोल्हापूरवासीयांसाठी आनंदाचा आणि कौटुंबिक सोहळाच आहे.

वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक टाऊन हॉल परिसर नेत्रदीपक रोषणाईने उजळून गेला होता. आकर्षक सजावट, भव्य व्यासपीठ, गालिचाने आच्छादलेला प्रवेशमार्ग, स्वागत कमान आणि त्याला सुसंगत अशा विविध रंगांची उधळण करणारी प्रकाश योजना यामुळे गर्द हिरवाईने नटलेल्या या बागेचे सौंदर्य आणखी खुलले आहे. ऐतिहासिक टाऊन हॉलच्या इमारतीलाही नयनमनोहरी अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य लढ्यातील भागीदार आणि साक्षीदार असलेल्या दै. 'पुढारी'च्या भाऊसिंगजी रोडवरील मुख्य कार्यालयाच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे भाऊसिंगजी रोडवरील हा सारा परिसर रोषणाईने उजळून गेला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता वर्धापन दिनाच्या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच रविवारी विविध स्तरातून दै. 'पुढारी' आणि 'पुढारी न्यूज'वर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news