गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील पाच रस्ता परिसरामध्ये बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या टोळीला गडहिंग्लज पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या टोळीकडून १००, २०० व ५०० रुपयांच्या एकूण १ लाख ८८ हजार ६०० रुपयांच्या नोटांसह मोटरसायकल जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई शुक्रवारी केली.
अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय २५, रा. एकसंभा रोड मेहबुबनगर, चिक्कोडी), अनिकेत शंकर हुले (वय २०, रा. महागाव, ता. गडहिंग्लज), संजय आनंदा वडर (वय ३५, रा. शिक्षक कॉलनी नेसरी, ता. गडहिंग्लज) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास अब्दुलरजाक मकानदार हा मोटरसायकलवरून महागाव येथील अनिकेत हुले याच्या घरी आला होता. त्याचवेळी नेसरीमधील संजय वडर याठिकाणी आल्याने पोलिसांचा संशय बळावला. मकानदार याने या दोघांच्याकडे नोटा दिल्यानंतर पोलिसांनी झडप घालून या तिघांना पकडले. त्यांच्याकडून बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचलंत का ?