कोल्हापूर : सत्तारुढ आघाडीचा एकतर्फी विजय

कोल्हापूर : सत्तारुढ आघाडीचा एकतर्फी विजय
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य व शिवसेना (शिंदे गट) प्रणीत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवत विरोधी आघाडीचा धुव्वा उडवला. 18 पैकी 16 जागा जिंकून बाजार समितीवर सत्ता कायम राखली. विरोधी आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. हमाल-तोलाईदार गटात अपक्ष उमेदवार विजयी झाला. व्यापारी गटातील दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर निकाल जाहीर करण्यात आला. विजयानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

रविवारी सकाळी आठ वाजता रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. साडेआठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीमध्ये ग्रामपंचायत, अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार या तीन गटांची 33 टेबलवर मतमोजणी घेण्यात आली. ग्रामपंचायत गटामध्ये सुरुवातीपासून सत्तारूढ आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. ही आघाडी वाढतच गेली. सकाळी नऊ वाजता हमाल-तोलाईदार मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. त्यात अपक्ष उमेदवार बाबूराव खोत विजयी झाले.

सर्वाधिक चुरशीच्या व्यापारी अडते गटात विरोधी आघाडीचे नंदकुमार वळंजू सुरुवातीपासून आघाडीवर होते. सत्तारूढ आघाडीचे वैभव सावर्डेकर व कुमार आहुजा यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. वळंजू यांना 311, सावर्डेकर यांना 278 तर आहुजा यांना 277 मते मिळाली होती. अमर क्षीरसागर यांना 271 मते पडल्याने ते चौथ्या स्थानावर राहिले. मताचा फरक कमी असल्यामुळे क्षीरसागर यांनी आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. सर्व गटातील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर फेरमतमोजणी घेतली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी सांगितले. पहिल्या फेरीतील मतमोजणी पावणेअकराच्या सुमारास पूर्ण झाली. सकाळी 11 वाजता दुसर्‍या फेरीत विकास सेवा संस्था गटाची मतमोजणी सुरू झाली. यामध्ये सत्तारूढ आघाडीचे सर्व उमेदवार पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिले. दुपारी एक वाजता या गटाची मतमोजणी संपली. त्यामध्ये सत्तारूढ आघाडीतील सर्व 11 उमेदवार सुमारे 6 हजार मताच्या फरकाने विजयी झाले.

समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर निकाल

व्यापारी गटाच्या फेरमतमोजणीस दुपारी दोन वाजता प्रारंभ झाला. त्यात वैभव सावर्डेकर यांना मिळालेल्या 278 मतांमध्ये एक मत कमी झाल्याने मतांची संख्या 277 वर आली. कुमार आहुजा यांना देखील 277 मते होती. समान मते मिळालेल्या सावर्डेकर आणि आहुजा यांच्यापैकी एकास विजयी घोषित करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी चिठ्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये कुमार आहुजा यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

नाना कांबळे 1180 मताधिक्याने विजयी

अनुसूचित जाती जमाती गटातील विजयी झालेले नाना धर्मा कांबळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. कागल तालुक्यात ते माजी आ. संजय घाटगे गटाचे कार्यकर्ते आहेत. नाना कांबळे यांना 3233 मते मिळाली असून विरोधी आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांना 2053 मते मिळाली. नाना कांबळे 1,180 मताधिक्याने विजयी झाले.

भुयेकरांची दुसरी पिढी समितीत

बाजार समितीच्या राजकारणात बाबासाहेब पाटील-भुयेकर यांचे एकेकाळी वर्चस्व होते. स्वत: भुयेकर हे चारवेळा बाजार समितीवर निवडून गेले होते. बाबासाहेबांच्या नंतर त्यांचे चिरंजीव भारत पाटील (भुयेकर) हे बाजार समितीवर निवडून गेल्याने भुयेकरांची दुसरी पिढी बाजार समितीच्या राजकारणात आली आहे.

दोन माजी संचालक विजयी

या निवडणुकीत अडते-व्यापारी मतदारसंघातून नंदकुमार वळंजू व हमाल तोलाईदार मतदारसंघातून बाबूराव खोत हे दोन माजी संचालक विजयी झाले.

निवडणूक विभागाचे नेटके नियोजन

निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी मतदान आणि मतमोजणीसाठी नेटके नियोजन केले. यासाठी त्यांना वरिष्ठ सहकार अधिकारी मिलिंद ओतारी, उदय उलपे, चंद्रकांत इंगवले यांचे सहकार्य लाभले.

प्रकाश देसाई यांना सर्वात जास्त मते

विकास सेवा संस्था गटातून प्रकाश देसाई यांना सर्वात जास्त 9 हजार 592 मते मिळाली आहेत.

कामगारांच्या एकजुटीचा विजय

हा विजय कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे. आपल्या विजयासाठी कामगारांनी मोठे परिश्रम घेतले, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार बाबूराव खोत यांनी व्यक्त केली.

विजयी उमेदवारांना मिळालेली मते अशी

1) विकास सेवा संस्था मतदार संघ

सर्वसाधारण गट
प्रकाश देसाई 9,592
राजाराम चव्हाण 9,397
भारत पाटील-भुयेकर 9,395
शेखर देसाई 9,321
बाळासाहेब पाटील 9,316
संभाजी पाटील (पैलवान) 9,277
सूर्यकांत पाटील 9,151

महिला प्रतिनिधी
सौ. मेघा देसाई 9,499
सोनाली पाटील 9,350
इतर मागासवर्गीय गट
शंकर पाटील 9,726
विमुक्त जाती, भटक्या जमाती
संदीप वरंडेकर 9,536

2) ग्रामपंचायत मतदारसंघ
सर्वसाधारण
सुयोग चौगले-वाडकर 3,176
शिवाजी पाटील 3,010
अनुसूचित जाती-जमाती
नाना धर्मा कांबळे 3,233
आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक
पांडुरंग काशीद 3,259

3) अडते-व्यापारी मतदारसंघ
नंदकुमार वळंजू 311
कुमार आहुजा 277

4) हमाल-तोलाईदार मतदारसंघ
बाबूराव खोत 411.

वैभव सावर्डेकर यांना दुसर्‍यांदा हुलकावणी, आहुजा यांना संधी

बाजार समितीच्या निवडणुकीत वैभव सावर्डेकर यांना दुसर्‍यांदा विजयाने हुलकावणी दिली. मतमोजणीत त्यांना 278 तर कुमार आहुजा यांना 277 मते मिळाली. फेरमतमोजणीत सावर्डेकर यांचे एक मत कमी झाल्याने दोघांची मते समान झाली. त्यामुळे चिठ्ठीवर निर्णय घेण्यात आला. यामध्ये आहुजा यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे ते नशीबवान ठरले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news