पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli vs Tendulkar : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली 2023 मध्ये उत्कृष्ट लयीत दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांत त्याने शतकी खेळी साकारून जगभरातील गोलंदाजांना धडकी भरवली आहे. विराटचा हा फॉर्म पाहून त्याच्याकडून खूप अपेक्षा केल्या जात आहेत. या वर्षी तो अनेक विक्रम मोडेल, असे मानले जात आहे. त्यात सचिन तेंडुलकरच्या एका खास विक्रमाचाही समावेश आहे. तो या वर्षी सचिन तेंडुलकरचा आशियातील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडू शकतो. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत कोहलीच्या नावावर या विक्रमाची नोंद होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सचिन तेंडुलकरने आशिया खंडात खेळताना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 281 डावात एकूण 38 शतके झळकावली आहेत. या प्रकरणात विराट कोहली 31 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 142 डावांमध्ये ही शतके झळकावली आहेत. यावर्षी आशियामध्ये खेळताना कोहली सहज 8 शतके झळकावू शकतो, असा विश्वास अनेक दिग्गजांना आहे. (Kohli vs Tendulkar)
आता न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौ-यावर येणार असून दोन्ही देशांदरम्यान तीन-तीन वनडे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. 18 जानेवारीपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर या वर्षी होणार्या वन-डे विश्वचषकाचेही यजमानपद भारताकडेच असणार आहे. अशा स्थितीत कोहलीकडे आशियामध्ये खेळताना 8 शतके झळकावण्याची सुवर्ण संधी आहे. (Kohli vs Tendulkar)
या वर्षी कोहली सचिन तेंडुलकरचा वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडेल. सचिन तेंडुलकरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 49 शतके झळकावली आहेत. तर कोहलीने 46 शतके झळकावली आहेत. अशा स्थितीत सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी त्याला आता वनडेत केवळ चार शतकांची गरज आहे. या वर्षी त्याने ज्या पद्धतीने वन-डे मध्ये पुनरागमन केले आहे, त्यावरून सचिनचे दोन्ही रेकॉर्ड तो सहज मोडेल असे दिसते. (Kohli vs Tendulkar)