पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. दुबई येथे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. मागील काही दिवस ते आजारी होते. परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ मध्ये दिल्लीतील दरियागंज परिसरात झाला. १९४७ मध्ये भारताची फाळीनंतर काही दिवसांनी Pervez Musharrf यांचे कुटुंबीय किस्तानला रवाना झाले. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी नवाझ शरीफने मुशर्रफ यांची लष्करप्रमुखपदावरुन हकालपट्टी केली. यानंतर मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ विरुद्ध लष्करी बंड पुकारत देशाची सत्ता हाती घेतली होती. जाणून घेवूया मुशर्रफ यांच्या कारर्कीदीतील महत्त्वाच्या घडामोडी…
मुशर्रफ हे १९९८ मध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख झाले. लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी भारताविरोधात कारगिल युद्धाचा कट रचला. १९९९ साली पाकिस्तानी सैन्याला कारगील युद्धामध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर मुशर्रफ व तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांच्या दरम्यान मतभेद निर्माण झाले होते. मी कारगिल जिंकण्याची शपथ घेतली होती. मात्र नवाज शरीफ यांच्यामुळे माझा स्वप्नभंग झाला, अशी कबुलीच मुशर्रफ यांनी त्यांच्या 'इन द लाइन ऑफ फायर' या आपल्या आत्मचरित्रात दिली होती.