अब तक अजित पवार : जाणून घ्या हुकलेल्या मुख्यमंत्रिपदापासून ते पाचव्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत

अब तक अजित पवार : जाणून घ्या हुकलेल्या मुख्यमंत्रिपदापासून ते पाचव्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत

Published on

पुढारी ऑनलाईन: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर 8 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 'अजित पवार नॉट रिचेबल' ते 'अजित पवार बंड करणार' अशा बातम्या काही महिन्यांनी माध्यमांत झळकत असतात. शरद पवारांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांकडे पक्षाची धुरा सोपवणार असल्याचीही जोरदार चर्चा झाली. मात्र, शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतल्यानं या चर्चा थांबल्या.

अजित पवार झपाटलेपणानं काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राजकीय रणनीतीतला बेभरवशी वृत्ती दाखवणारे, तर कधी उघडपणे नाराजी दाखवून पक्षालाच सारवासारव करायला लावणारे अजित पवार हे सर्वांनाच चांगलेच परिचित आहेत. एवढं असतानाही अजित पवार या माणसाचा अनेकांना थांग पत्ता लागत नाही. या सर्व गोष्टींचा उगम अजित पवारा यांच्या राजकीय प्रवासात पाहायला मिळतो का?, हे आपण आज पाहणार आहोत.

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 'देवळाली-प्रवरा' या गावी झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे मोठे भाऊ आणि अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते. अजित पवार यांचा विवाह उस्मानाबाद आताचे धाराशिव जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहिण सुनेत्रा यांच्याशी झाला. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.

अजित पवार यांची शैक्षणिक माहिती :

सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या अजित पवारांचे आयुष्य सुरुवातीला खूप हालाखीच्या परिस्थितीतून गेलं आहे. त्यांचं शालेय शिक्षणही देवळाली प्रवरा येथे झाले. अजित पवार हे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी मुंबईत आपले काका शरद पवार यांच्याकडे आले. मुंबईत त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. मात्र, वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर शिक्षण सोडुन त्यांना पुन्हा बारामतीला परतावं लागलं. येथे आल्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

अजित पवार यांची राजकीय माहिती :

बारामतीमध्ये परतल्यावर १९८२ मध्ये अजित पवार यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यावर्षी ते सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवडुन आले. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. पुढे जाऊन १९९१ मध्ये संसदीय राजकारणाला प्रारंभ केल्यानंतर आजतागायत अजित पवार यांनी सहकारी संस्थांच्या राजकारणावर आपलं पूर्णपणे लक्ष केंद्रीत केलं आहे.

१९९१ रोजी अजित पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेवर संचालक निवडून गेले. ते बँकेचे अध्यक्षही झाले. नंतर जवळपास १६ वर्ष ते सातत्याने पुणे बँकेच्या अध्यक्षपदी राहिले. १९९१ मधेच ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र, शरद पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोडून केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जावं लागल्याने अजित पवार यांनी त्यांच्यासाठी राजीनामा दिला. त्याचवेळी शरद पवार यांच्या विधानसभेच्या जागेवर अजित पवार हे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

त्यानंतर काही दिवसातचं त्यांच्याकडे राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारी आली. पवार हे जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ आणि नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या दरम्यान ते कृषी, फलोत्पादन, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन या खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार यांनी पाठीमागे कधीही वळून पाहिलं नाही. १९९१ पासून ते आतापर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. अजित पवारांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा इतिहास घडविणारे नेते म्हणून ओळखलं जातं. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ६५ हजार मतांच्या मताधिक्याने पवार निवडून आले आहेत.

१९९५ ते १९९९ या दरम्यान युतीचे शासन सत्तेत होते. तेवढा अपवाद वगळता १९९९ पासून २०१४ पर्यंत अजित पवार यांनी सातत्याने विविध खात्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले. ते तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

एक फसलेलं बंड :

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस- पवार हे सरकार अत्यंत आश्चर्यकारकरित्या सत्तेत आलं होतं. फडणवीस आणि पवार यांनी सकाळी राज्य जागे होतं असतानाच शपथविधी उरकून देशाला मोठा राजकीय धक्का दिला होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार अवघं तीन दिवस टिकलं.

महाविकास आघाडी सरकार :

शिंदे फडणवीस सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीच सरकार सत्तेत येऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. या सरकारमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री जबाबदारी पार पाडली. महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर त्यांच्याकडे राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी आली होती. त्यानंतर विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत २ जुलै रोजी त्यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अजित पवार आणि वाद :

अजित पवार यांना त्यांच्या स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळेही संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जातं. यामुळे ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकलेले आहेत. मात्र, त्यानंतर तेवढ्याच तत्परतेने दिलगीरीही व्यक्त करतात. एकदा एका वक्तव्यामुळे वादात अडकल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश उपोषण केलं होतं.

अजित पवारांचा राजकीय प्रवास

संसदीय राजकारण :

१७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१. (लोकसभा सदस्य)

१९९१ ते १९९५ (विधानसभा सदस्य)

नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ – राज्यमंत्री, जलसंधारण, उर्जा आणि नियोजन

२८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ – राज्यमंत्री, कृषी, फलोत्पादन आणि उर्जा

१९९५ ते १९९९ – विधानसभा सदस्य

१९९९ ते २००४ – विधानसभा सदस्य

२७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर, २००३ – मंत्री, पाटबंधारे (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन

२००४ ते २००९ – विधानसभा सदस्य

२६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ – मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे)

नोव्हेंबर २००९ – विधानसभा सदस्य

९ नोव्हेंबर, २००४ ते ७ नोव्हेंबर, २००९ – मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता

७ नोव्हेंबर, २००९ ते ९ नोव्हेंबर, २०१० – मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा

११ नोव्हेंबर २०१० ते २९ सप्टेंबर २०११४ उपमुख्यमंत्री (वित्त आणि नियोजन, ऊर्जा)

ऑक्टोबर २०१४ – विधानसभा सदस्य

ऑक्टोबर २०१९ – विधानसभा सदस्य

नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ – उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

जुलै २०२२ ते आजपर्यंत – विरोधी पक्ष नेते

सहकारी आणि इतर संस्थांमध्ये भुषविलेली पद :

विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती

संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर

संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे

संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई

संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे

अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई

संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघ

अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news