पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 16वा सीझन सुरु आहे. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा माजी अली खानवर आता ICC ने मोठी कारवाई केली आहे. शनिवारी, यूएसएचा वेगवान गोलंदाज अली खानवर आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या भंगासाठी पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली. वास्तविक, यापूर्वी त्याला तीन डिमेरिट गुण मिळाले होते आणि आता त्यात आणखी एका गुणाची भर पडल्याने त्याला या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर तो ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. यासाठी त्याला मॅच फीच्या 15 टक्के दंडही ठोठावला आहे.
तर अन्य अमेरिकन खेळाडू जसदीप सिंगला मॅच फीच्या 30 टक्के आणि दोन डिमेरिट पॉइंट्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच जर्सीचा खेळाडू इलियट माइल्स याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्याला मॅच फीच्या 15 टक्के आणि एक डिमेरिट पॉइंटचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विकेट घेतल्यानंतर अश्लील भाषा वापरणे, फलंदाजाला बेताल पद्धतीने हावभाव करणे यासारख्या गोष्टींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अली खान दोषी आढळला. अलीने 4 एप्रिल रोजी जर्सीविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांत 7 बळी घेतले होते. त्यादरम्यान ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. त्यामुळे अलीसह अमेरिकेच्या जसदीप सिंग आणि जर्सी संघाचा माइल्स यालाही दंड ठोठावण्यात आला आहे. या तिन्ही खेळाडूंनीही आपले आरोप मान्य केले आहेत.
अलीच्या खात्यात आधीच तीन डिमेरिट पॉइंट्स आल्यानंतर लगेचच त्याचे एकूण चार गुण झाले. आता तो आयसीसीच्या नियमांनुसार अमेरिकेसाठी पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामने (T20 किंवा ODI) खेळू शकणार नाही. कोणत्याही खेळाडूच्या खात्यात चार डिमेरिट गुण असतील तर त्याला दोन सामन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागेल. 2021 च्या सुरुवातीला, अलीला बर्म्युडा विरुद्धच्या त्याच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन वेगवेगळ्या घटनांसाठी तीन डिमेरिट गुण देण्यात आले होते.
अली हा शाहरुख खानच्या केकेआर (KKR) संघाचा भाग होता. त्याचा जन्म 1990 मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला. यानंतर, वयाच्या 18 व्या वर्षी तो आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाला. तेव्हापासून तो अमेरिकेतच क्रिकेट खेळत आहेत. अली खानला केकेआरने 2020 मध्ये 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील केले होते. अशाप्रकारे आयपीएलमध्ये निवड झालेला तो पहिला अमेरिकन खेळाडू ठरला होता. मात्र दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला. अली खानने आतापर्यंत 12 एकदिवसीय आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अमेरिकेकडून 35 (30 वनडे आणि पाच टी-20) बळी घेतले आहेत.