लाल वादळ लोणीत धडकणार: किसान सभेच्या लाँग मार्चला सायंकाळी सहाला सुरुवात

लाल वादळ लोणीत धडकणार: किसान सभेच्या लाँग मार्चला सायंकाळी सहाला सुरुवात
Published on
Updated on

अकोले, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले येथून सायंकाळी सहा वाजता डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च निघाला. हा लाँग मार्च राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणीतील कार्यालयावर धडकणार आहे. पोलिसांनी आंदोलकांना 149 ची नोटीस बजावत परवानगी नाकारली. मात्र, शेतकऱ्यांनी निर्धार कायम ठेवत लाँग मार्च काढला आहे .

या लाँग मार्चचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, किसन गुजर, सुभाष चौधरी, चंद्रकांत घोरखाना, संजय ठाकूर, डॉ. उदय नारकर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, रडका कलांगडा, अर्जुन आडे, यशवंत झाडे, सिद्धप्पा कलशेट्टी, उद्धव पौळ, माणिक अवघडे, शामसिंग पाडवी, इरफान शेख, रमेश चौधरी, चंद्रकांत धांगडा, चंद्रकांत वरठा, विजय काटेला, शंकर सिडाम, अजय बुरांडे, गोविंद आर्दड, अनिल गायकवाड, महादेव गारपवार, अमोल वाघमारे, सदाशिव साबळे आदि करत आहेत. तसेच अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली.

काय आहेत मागण्या?

उभ्या महाराष्ट्रालाअवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनानत नुकसान झाले. अनेक भागात फळबागा मातीमोल झाल्या. आंब्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ही नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे. गायरान जमीन, दूध धोरण, दूध एफआरफी समितीचे न झालेले गठण, दूध आयातीला विरोध अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.

अकोले पोलिसांकडून मोर्चेकरांना कडक ऊन असल्याने एखाद्या आंदोलकास उष्माघाताचा त्रास झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच १४९ ची नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांनी कडक उन्हाचे कारण देत आंदोलनाचे नेते अजित नवले यांना मोर्चा काढू नये, अशी नोटीस दिली आहे. मात्र, नवले यांनी कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच असे ठामपणे सांगितले त्यानंतर बाजारतळातुन सायंकाळी सहा वाजता भव्य राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला आहे.

पी. साईनाथ होणार सहभागी

अकोले ते लोणी या लॉंग मार्चमध्ये आपण पूर्णवेळ सहभागी होणार आहोत, अशी माहिती मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि जागतिक कीर्तीचे पत्रकार पी.साईनाथ यांनी दिली.

वरण, भात, भाजी…

अकोले येथून निघण्यापूर्वी आंदोलक शेतकऱ्यांनी एका मोकळ्या रानात चूल पेटवून जेवण तयार केले. यामध्ये वरण, भात, वांग्याची भाजी याचा समावेश होता. या ठिकाणी जेवण झाल्यानंतर सहाच्या सुमारास आंदोलकांनी लोणीकडे मार्गाक्रमण सुरू केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news