सातारा, पुढारी वृत्तसेवा : "भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणे हा आपला अजेंडा असून त्याची सुरुवात आता केली आहे. आपल्याला कोणी कितीही अडवले तर आपण थांबणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार", अशी तोफ डागत भाजप (BJP Leader) नेते किरीट सोमय्या यांनी मध्यरात्री दीड वाजता साताऱ्यात एंट्री केली.
दरम्यान, सोमय्या साताऱ्यात येणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत तक्रार देण्यासाठी व पुरावे एकत्र गोळा करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला निघाले आहेत. आठ दिवसापूर्वी ते कोल्हापूरला निघाले असताना कराड (जि. सातारा) येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आठ दिवसांनंतर आता पुन्हा सोमय्या (BJP Leader) यांनी कोल्हापूरला जाण्यासाठी दंड थोपटले असून तसा दौराच चार दिवसांपूर्वी जाहीर केला.
दौरा जाहीर केल्यानुसार ते सोमवारी मध्यरात्री साताऱ्यात आले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, विकास गोसावी, प्रवीण शहाणे उपस्थित होते. दरम्यान, सोमय्या साताऱ्यात येणार असल्याने शासकीय विश्रामगृहात सुमारे २० पोलिस अधिकारी, कर्मचारी रात्री ९ वाजल्यापासून तैनात होते. यामध्ये १ पोलिस उपअधीक्षक, १ पोनि,१ सपोनि व १८ पोलिसांचा समावेश होता.