पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान प्रिमियर लीग ( पीएसएल ) स्पर्धेत वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डचा धमाका सुरूच आहे. मुल्तान सुलतान या संघाकडून खेळताना कायरन पोलार्डने टी-20 क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. पोलार्डने लाहोर कलंदर्सविरोधात खेळताना २८ चेंडूमध्ये २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३९ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या सहाय्याने कायरन पोलार्डने टी20 क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. (Kieron Pollard)
यापूर्वी वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज क्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक यांनी टी-20 क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली होती. आता या यादीमध्ये कायरन पोलार्डच्या नावाचा समावेश झाला आहे. याशिवाय पोलार्डच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. पोलार्डने आतापर्यंत ८०० षटकार लगावण्याची कामगिरी केली आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर क्रिस गेल आहे. त्याने १०५६ षटकार फटकावले आहेत. (Kieron Pollard)
'पीएसएल' स्पर्धेतील मुल्तान सुल्तांस विरूद्ध लाहोर कलंदर्स सामना लाहोरमध्ये खेळवण्यात आला. लाहोरच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत १८० धावा केल्या. १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुल्तान सुलतानच्या संघ १५९ धावापर्यंतच मजल मारु शकला. लाहोर कलंदर्सकडून राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. (Kieron Pollard)