Khelo India Youth Games : महाराष्ट्र तिसर्‍यांदा चॅम्पियन!

Khelo India Youth Games : महाराष्ट्र तिसर्‍यांदा चॅम्पियन!

भोपाळ, वृत्तसंस्था : महाराष्ट्राने खेलो इंडिया (Khelo India Youth Games) युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56+55+50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने या स्पर्धेत तिसर्‍यांदा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी 2019 पुणे आणि 2020 आसाम येथेही महाराष्ट्र विजेते ठरले होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी तीन सुवर्ण आणि प्रत्येकी एका रौप्य, तसेच ब्राँझपदकाची कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

कुस्तीत नरसिंग पाटील याला ब्राँझ (Khelo India Youth Games)

महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्तीमध्ये शेवटच्या दिवशी एका ब्राँझपदकाची कमाई झाली. कोल्हापूरच्या नरसिंग पाटील याने फ्री स्टाईल विभागातील 55 किलो गटात हे यश संपादन केले. त्याने राजस्थानच्या अनुज कुमार याच्यावर शानदार विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्याला राजस्थानच्या ललित कुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. नरसिंग हा बेळगाव येथील आर्मी बॉईज इन्स्टिट्यूटमध्ये सराव करीत आहे. महाराष्ट्राला कुस्तीमध्ये यंदा येथे दोन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई झाली. स्पर्धेत महाराष्ट्राला योगासन, तलवारबाजी या क्रीडाप्रकारात घवघवीत यश मिळाले.

मल्लखांबमध्येही महाराष्ट्राचे खेळाडू चमकले. जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने आपली छाप पाडली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळेने आपला ठसा उमटविला. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, नेमबाजी या प्रकारातही यश मिळविले.

जलतरण : मुलांमध्ये महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद तर मुलींमध्ये उपविजेतेपद

सुवर्ण जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अपेक्षा फर्नांडिस हिने शेवटच्या दिवशी आपले सातवे सुवर्णपदक जिंकले, तर वेदांत माधवन याने रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेतील स्वतःचे पाचवे सुवर्णपदक पटकाविले. त्यांच्या या कामगिरीमुळेच महाराष्ट्राला मुलांच्या गटात सांघिक विजेतेपद तर मुलींमध्ये सांघिक उपविजेतेपद मिळाले.

जलतरणच्या शेवटच्या दिवसाची महाराष्ट्राची सुरुवात धृती अग्रवाल हिने मिळवलेल्या कांस्यपदकाने झाली. दोनशे मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत तिने दोन मिनिटे 28.67 सेकंद वेळ नोंदविली. चुरशीने झालेल्या या शर्यतीत शेवटचे पन्नास मीटर्स बाकी असताना ती चौथ्या स्थानावर होती. मात्र, शेवटच्या 25 मीटर्स अंतरात तिने आपला वेग वाढवीत पदकावर नाव कोरले. मुंबईच्या या खेळाडूने आजपर्यंत भरघोस पदके जिंकली आहेत. या शर्यतीत महाराष्ट्राच्या राघवी रामानुजन हिनेदेखील अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तिला पदकापासून वंचित व्हावे लागले.

* 56 सुवर्ण, 55 रौप्य, 50 ब्राँझपदके
* अपेक्षा फर्नांडिस ठरली सुवर्ण कन्या (सात सुवर्णपदके)
* जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळे, सायकलिंगमध्ये पूजा दानोळेची चमकदार कामगिरी
* जलतरण, योगासन, अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, तलवारबाजी, मल्लखांब मध्ये चॅम्पियनशिप

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news