खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या समर्थकांनी भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू यांना धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच न्यूयॉर्कमध्ये घडली. अमेरिकेने भारतावर पन्नूला मारण्याचा आरोप केल्यानंतर ही घटना घडली आहे. ज्या अमेरिकेने ओसामा बिन लादेनच्या शोधात अफगाणिस्तानच्या तेरा बोरा टेकड्या धुंडाळल्या आणि शेवटी पाकिस्तानात घुसून लादेनला ठार मारले, तीच अमेरिका अफगाणिस्तानात लपलेल्या अल जव्हारीला ड्रोन क्षेपणास्त्राने ठार मारते आणि ज्या अमेरिकेने सद्दाम हुसेनला शोधून फाशी दिली, त्या अमेरिकेला दहशतवादी निज्जरच्या हत्येची आणि पन्नूवरील हल्ल्याच्या कटाची इतकी चिंता का?
भारतासोबतचा राजनैतिक वाद असतानाही कॅनडात खलिस्तान समर्थकांकडून हिंसाचार सुरू आहे. दुसरीकडे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील गुरुद्वारामध्ये नतमस्तक होण्यासाठी गेलेले भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांना खलिस्तान समर्थकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा करावा तितका निषेध थोडा आहे. खलिस्तान समर्थकांनी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसाठी त्यांना जबाबदार धरून घोषणाबाजी केली आणि आरोप केला की, त्यांनीच एसएफजे नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचला होता. कॅनडातील हिंदू मंदिरांबाहेर खलिस्तानी घटक सातत्याने निदर्शने करत आहेत. पन्नू याने तर हिंदूंना कॅनडातून बाहेर काढण्याची धमकीही दिली आहे. पन्नूने अलीकडेच एअर इंडियाच्या विमानांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. तो सतत भारताविरुद्ध विष ओकत आहे. पन्नू हा अमृतसरमधील खानकोट गावचा रहिवासी असून सध्या अमेरिकेत राहून तो पंजाबमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी मोहीम चालवत आहे. भारताने त्याला दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर डझनाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो नेहमीच खलिस्तानच्या स्थापनेबद्दल फुशारक्या मारत राहतो. हा दहशतवादी इतका प्रभावशाली झाला आहे की, तो कॅनडामध्ये राहणार्या भारतीय समुदायामध्ये धर्माच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
कॅनडात जेव्हा मूठभर खलिस्तान समर्थकांनी मंदिरासमोर निदर्शने केली तेव्हा हिंदू समाजातील लोकही त्यांच्यासमोर उभे राहिले. ते 'भारत माता की जय'च्या घोषणा देऊ लागल्यावर खलिस्तान समर्थकांची पळापळ झाली. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या भूमिकेबाबत अमेरिकेने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना गुप्तचर माहिती पुरवली होती, असे 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या अहवालात म्हटले आहे. अलीकडेच अमेरिकन वृत्तपत्र 'फायनान्शिअल टाईम्स'नेही सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने आपल्या देशाच्या भूमीवर हाणून पाडला आहे. अहवालानुसार, अमेरिकेने भारतावर या कटात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यानंतर अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि अमेरिकेला भारतासोबतचे संबंध कसे राखायचे आहेत, असाही सवाल विचारला जात आहे. पन्नूकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्यामुळे कॅनडा आणि अमेरिकेच्या सरकारचे त्याला संरक्षण आहे, असा या अहवालांचा अर्थ होतो.
दहशतवादी निज्जरच्या हत्येच्या तपासात कॅनडाला सहकार्य करू, असेही अमेरिकेने भारताला सांगितले होते. ज्या अमेरिकेने ओसामा बिन लादेनच्या शोधात अफगाणिस्तानच्या तेरा बोरा टेकड्या धुंडाळल्या आणि शेवटी पाकिस्तानात घुसून लादेनला ठार मारले, तीच अमेरिका अफगाणिस्तानात लपलेल्या अल जव्हारीला ड्रोन क्षेपणास्त्राने ठार मारते आणि ज्या अमेरिकेने सद्दाम हुसेनला शोधून त्याला फाशी दिली, त्या अमेरिकेला दहशतवादी निज्जरच्या हत्येची आणि पन्नूवर हल्ल्याच्या कटाची इतकी चिंता का? कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यावर कधी प्रश्न उपस्थित केला आहे का? जस्टिन ट्रुडो एकापाठोपाठ एक चुका करत आहेत. त्यामुळे कॅनडात इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त दहशतवादी आणि गुंड आजघडीला तयार झाले आहेत.
तेथील ड्रग्ज तस्कर, दहशतवादी आणि गुंड आपापसात लढत आहेत. हे तेच खलिस्तानी आहेत ज्यांनी भारताचे कनिष्क विमान उडवले होते, ज्यात 300 हून अधिक कॅनेडियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. खलिस्तान समर्थक गुन्हेगार तेथे मुक्तपणे फिरत आहेत. ट्रुडो यांचा खलिस्तान समर्थकांशी करार असल्याचे सांगितले जाते. त्यामागचे कारण म्हणजे, त्यांच्या अल्पसंख्याक सरकारला खलिस्तानी पक्षांचा पाठिंबा आहे. आपले अल्पसंख्याक सरकार वाचवण्यासाठी ट्रुडो भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत आहेत आणि बेछूट आरोप करत आहेत. महागाई, बेरोजगारी आणि ढासळत चाललेली अर्थव्यवस्था यामुळे कॅनडातील ट्रुडो यांची लोकप्रियता घसरली असल्याने ते कसे तरी आपले स्थान वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे अमेरिका भारतासोबत व्यापार आणि धोरणात्मक भागीदारी वाढवत आहे. या महिन्यात भारत आणि अमेरिका यांच्यात 2+2 मंत्रीस्तरीय चर्चा झाली आहे; परंतु दहशतवादाच्या बाबतीत अमेरिका दुटप्पी डाव खेळत आहे.
भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढल्यास अमेरिकेचे राजनैतिक प्राधान्यक्रम काय असतील, हेदेखील या वादातून सूचित होते. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला असला, तरी वस्तुस्थिती अशी आहे की, कॅनडा हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. यूएस-मेक्सिको-कॅनडा करारामुळे त्यांचे पारंपरिक संबंध आहेत. एका बाजूला जवळचा आर्थिक व सांस्कृतिक संबंध असलेला भागीदार आणि दुसर्या बाजूला चीनच्या वाढत्या वर्चस्वाचा समतोल राखण्यासाठीचा भागीदार यापैकी एकाची निवड अमेरिकेला करावी लागणार आहे. विशेषत: जेव्हा अमेरिका जपान, दक्षिण कोरिया आणि फिलिपाइन्सच्या माध्यमातून त्रिपक्षीय युतीच्या रूपात पर्याय शोधत आहे. अशा स्थितीत भारताचा कॅनडाप्रती असलेला रोष रास्तच आहे; पण भारताला देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये समतोल साधावा लागेल. पन्नू सातत्याने भारतविरारधी भूमिका घेत असतो. जगातील मोठ्या लोकशाही देशातील संसद उडवण्याची धमक पन्नूमध्ये आली कोठून? त्याच्या पाठीशी कोण आहेत, याचा आता भारताने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.