तिरुअनंतपूरम; वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान 'ईडी'ची चौकशी रास्त ठरत नाही, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते सर्व चौकशी करू शकतात, याचा उल्लेख यात केला गेला आहे. माजी मंत्री व पथानामथिट्टा येथून निवडणूक रिंगणात असलेले थॉमस इसाक यांच्याशी संबंधित याचिकेवर न्यायालयाने सदर निर्देश दिले.
निवडणुकीचा कालावधी पूर्ण होण्यासाठी जवळपास महिनाभराच्या आसपासचा कालावधी बाकी आहे. या कालावधीत उमेदवारांची चौकशी करणे रास्त ठरत नाही. जी चौकशी असेल ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करता येईल, असे न्या. टी. आर. रवी यांनी म्हटले आहे.
थॉमस इसाक यांच्याबाबतीत काही चौकशी करणे आवश्यक होते, असे 'ईडी'ने स्पष्टीकरण दिले. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. थॉमस इसाक यांनी त्यांच्या सोयीनुसार हजर राहावे, अशी त्यांना सवलत दिली जाऊ शकते, असे 'ईडी'च्या वकिलांनी सुनावणीदरम्यान म्हटले. त्यावर न्यायालयाने असे केल्यास त्या तारखेपर्यंत आपण हजर राहण्यास बांधिल नाही, असा पवित्रा ते घेऊ शकतात, अशी टिपणी केली आहे.