केन विल्यमसन भारता विरुद्ध खेळणार नाही; ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व

केन विल्यमसन भारता विरुद्ध खेळणार नाही; ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व

न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून बुधवार पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेस प्रारंभ होत आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ तीन टी२० सामने व दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी२० सामन्यांसाठी नुकताच न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला. आश्चर्याची बाब अशी की, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन मात्र ही मालिका खेळणार नाही. केन विल्यमसन संघासोबत भारतात आला आहे. पण, तो विश्रांती घेऊन कसोटी सामन्यांची तयार करणार असल्याचे बोलले जात आहे.

केन विल्यमसन हा न्यूझीलंड संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने कर्णधार व खेळाडू म्हणून न्यूझीलंडला सर्वोत्तम बनवले आहे. आयसीसीच्या मागील तीन महत्त्वांच्या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघाने अंतिम सामन्यात खेळण्याचा मान मिळवला व त्यातील एक स्पर्धा देखिल जिंकली. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोहचल्या नंतर केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालील न्यूझीलंड संघाने सातत्याने आपली कामगिरी उंचावली आहे. आपला शांत व संयमी स्वभाव तसेच आक्रमक फलंदाजी आणि प्रभावी नेतृत्वाद्वारे त्याने आपला खास चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की, केन विल्यमसन शिवाय न्यूझीलंड संघास पाहण्याची कोणालाही इच्छा होत नाही.

आयपीएल नंतर लगेच टी२० वर्ल्डकप सारखी मोठी स्पर्धा खेळल्यानंतर बऱ्याच खेळाडूंनी विश्रांती घेतली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतून माजी कर्णधार विराट कोहली याने सुद्धा विश्रांती घेतली आहे. तसेच नवा कर्णधार रोहित शर्मा देखिल या टी२० मालिकेनंतर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती घेणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा खेळल्या जात आहेत. त्याच बरोबर खेळाडू स्थानिक तसेच इतर देशातील टी२० लीग स्पर्धा खेळतात. त्यामुळे खेळाचा ओवर डोस होऊन त्याचा परिणाम खेळाडूंच्या क्षमतांवर होताना दिसत आहे. अतिताणामुळे काही खेळाडू सेमी रिटायरमेंट घेण्याकडे झुकले आहेत. तर काही खेळाडू ठराविक प्रकराचे क्रिकेट खेळण्यावर भर देत आहेत.

भारता विरुद्ध न्यूझीलंडचा संघ बुधवार १७ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे पहिला तर शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी रांची येथे दुसरा आणि रविवारी २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे तिसरा टी२० सामना खेळणार आहे. तसेच २५ नोव्हेंबर रोजी कानपूर येथे पहिला कसोटी सामना तर ३ डिसेंबरला मुंबई येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. टी२० मालिकेसाठी दोन्ही संघानी आपल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. भारताकडून टी२० संघाचे नेतृत्त्व नवा कर्णधार रोहित शर्मा करणार आहे. तर न्यूझीलंडने गोलंदाज टीम साऊथी याला टी२० मालिकेसाठी कर्णधार नियुक्त केले आहे.

न्यूझीलंडने टीम साऊथीला कर्णधार घोषीत करत या मालिकेसाठीच्या टीमची घोषणा केली. न्यूझीलंड संघात काईल जेमिसन, डेरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लॉकी फर्ग्यूसन देखिल दुखापतीमधून सावरुन या मालिकेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडचा टी२० संघ

टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्यूसन, मार्टीन गप्टील, काईल जेमिसन, ॲडम मिल्ने, डॅरेल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, टीम साऊथी, ईश सोधी, टीम सेफर्ट

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news