Nitesh Rane : ‘पोलिसांना बाजूला करा, ओवेसीला औरंगजेबाकडेच पाठवतो’

Nitesh Rane : ‘पोलिसांना बाजूला करा, ओवेसीला औरंगजेबाकडेच पाठवतो’

मुंबई : पुढारी ऑनलाईन : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (akbaruddin owaisi) यांनी गुरुवारी औरंगाबादेतील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओवेसी यांची काल औरंगाबादमध्ये सभा झाली. त्या आधी त्यांनी तेथील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर चौफेर टीका करत अकबरुद्दीन ओवेसी यांना सज्जड इशारा दिला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खरमरीत ट्विट करून राज्यातील पोलिसांना १० मिनिटांसाठी बाजूला केले तर अकबरुद्दीन ओवेसी यांना औरंगजेबाकडेच पाठवू. अन्यथा आम्ही स्वत:ला शिवरायांचे मावळे म्हणवून घेणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी ठाकरे सरकारवरही आगपाखड केली आहे. काहीही केले तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल, कारण राज्यात "नामर्दांचे सरकार आहे", ही गोष्ट अकबरुद्दीन ओवेसी यांना माहिती आहे, असा टोला लगावला त्यांनी (Nitesh Rane) लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अकबरुद्दीन ओवसी यांच्यावर जोरदार टीका केली. ओवेसी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे हा काही रितीरिवाज नाही. वारंवार संभाजीनगरमध्ये यायचे आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. आपल्या या कृतीमधून अशांतता निर्माण करायची, असे या ओवेसी बंधूंचे राजकारण आहे. औरंगजेबाला मराठ्यांनी कबरीमध्ये टाकले. तुम्ही आज औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडताय, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावे लागेल, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांच्या औरंगजेबाच्या कबरीला भेटी नाट्यानंतर मनसेही आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारने अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडाला तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते गजानन काळे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news