पुणे : कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हता : आ. रवींद्र धंगेकर, दै. ’पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट

आमदार रवींद्र धंगेकर यांचे स्वागत करताना दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव. 
या वेळी काँग्रेस नेते बाळासाहेब आमराळे.
आमदार रवींद्र धंगेकर यांचे स्वागत करताना दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव. या वेळी काँग्रेस नेते बाळासाहेब आमराळे.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ कधीही भाजपचा बालेकिल्ला नव्हता. या ठिकाणी तिहेरी लढती होत होत्या. त्यामुळे येथे भाजपला विजय मिळाला होता. एकास एक लढत झाल्यास येथे भाजपचा पराभव होऊ शकतो, हे पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याने आमचा विजय आणखी सुकर झाला, असे मत कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

आ. धंगेकर यांनी मंगळवारी दै. 'पुढारी'च्या कार्यालयास भेट दिली. दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी धंगेकर म्हणाले की, कसब्यातील मागील काही विधानसभा निवडणुकांचा विचार करता प्रमुख उमेदवारांच्या मतांची बेरीज भाजपच्या विजयी उमेदवारापेक्षा अधिक आहे. खा. बापट यांच्याविरोधात मी दोन निवडणुका लाढलो.

मात्र, आताची पोटनिवडणूक वेगळीच होती. या निवडणुकीत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाले. कार्यकर्ता मारण्याचे काम केले. मतदारांवर पैशाचा पाऊस पाडण्यात आला. पैसे देणारा आणि घेणार्‍यांमध्ये आत्मीयता नसते. प्रेमाला किंमत नसते; पण त्यात आत्मीयता असते. त्यामुळे नागरिकांवर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्याला मतदारांनी आमदार केले, असेही ते म्हणाले.

कसबा पेठेत जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासोबतच पाण्याचा व वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने बांधकामासंदर्भात धोरण, नियमावली तयार करणे गरजेचे आहे. तसेच, पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन नद्या जोडण्याचा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाने हाती घेणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाच्या नियमावलीमुळे शनिवारवाडा व इतर ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील बांधकामांना अडचणी येतात. त्यामुळे पुरातत्व विभागाने आपल्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यास पेठांमधील बांधकामांना चालना मिळेल, असेही धंगेकर म्हणाले.

पुण्यात सर्वाधिक मिळकतकर
पुण्यामध्ये देशात सर्वाधिक मिळकतकर असून, यातून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी बंद केलेली 40 टक्के सवलत त्वरित सुरू करावी. तसेच मुंबईप्रमाणेच पुण्यातही 500 चौरस फुटांच्या आतील सदनिकांवर मिळकतकर आकारला जाऊ नये. यासंदर्भात विधिमंडळात मी प्रश्न उपस्थित करून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचेही धंगेकर यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना उज्ज्वल भवितव्य
काँग्रेस पक्षाचे धोरण सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आहे. या पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उज्ज्वल भवितव्य आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांनी जनसामान्यांत मिसळायला हवे, असेही धंगेकर म्हणाले.

महापालिका अधिकार्‍यांची भेट
मिळकतकर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी धंगेकर यांनी सोमवारी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, वीरेंद्र किराड, रमेश अय्यर, प्रवीण करपे, कान्होजी जेधे आदी उपस्थित होते.

आ. थोपटेंचा मोठा वाटा
वसंतराव थोरात जेव्हा कसब्याचे आमदार झाले होते तेव्हा अनंतराव थोपटे यांनी पालकमंत्री म्हणून सर्व यंत्रणा कामाला लावली होती. आताही आमदार संग्राम थोपटे यांनी या पोटनिवडणुकीत आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. माझ्या विजयात त्यांचे मोठे योगदान आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची केवळ सावली जरी आपल्या अंगावर पडली तरी आपण धन्य होतो. मात्र, या पोटनिवडणुकीत त्यांचीही ताकद माझ्या मागे होती. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही धंगेकर म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news