कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमा पुन्हा बंद; खा. धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांना अटकाव

कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी टोल नाका येथे रविवारी रात्री बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिस
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी टोल नाका येथे रविवारी रात्री बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिस

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकारचे सोमवारपासून बेळगाव येथे होणारे हिवाळी अधिवेशन आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने होणारा महामेळावा आणि या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची राहणारी उपस्थिती, हे दरवर्षी पहावयास मिळणारे चित्र. यावर्षी देखील या मेळाव्यासाठी सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खा. धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य काही नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांना कर्नाटकात प्रवेश द्यायचाच नाही, अशी भूमिका घेऊन कर्नाटक सरकारने रात्रीपासून कर्नाटकच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.

शिवाय कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी टोलनाका येथे राज्य राखीव दल, सशस्त्र दलाच्या तुकड्यासह 1 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे दरवर्षी पहावयास मिळणारे चित्र यावर्षी मात्र तणावग्रस्त दिसत आहे.

मागील काही दिवसापासून ना. चंद्रकांतदादा पाटील व शंभूराजे देसाई हे बेळगाव दौऱ्यावर येणार अशी कुणकुण लागल्यानंतर कर्नाटक सरकारने अशाच प्रकारे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर जयत तयारी केली आणि त्यांचा दौरा रद्द करावा लागला. अर्थात सोमवारी महाराष्ट्रातून येणाऱ्या नेतेमंडळींच्या या दौऱ्याकडे त्याच भूमिकेतून बघितले जात आहे.

एकीकडे सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सीमा वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला होता. असे असताना कर्नाटकने पुन्हा आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक सरकारच्या अधिवेशन पार्श्वभूमीवर दरवर्षी बेळगाव येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील मंत्री व नेते मंडळी गनिमी काव्याने पोचतातच, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

परंतु मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, सीमावाद मोठ्या प्रमाणावर उफाळून आल्याने दोन्ही राज्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर खा. धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेते मंडळींना प्रवेश द्यावयाचा की नाही यासह महामेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आदेश आल्याने….

महाराष्ट्रातील नेतेमंडळी सोमवारी बेळगावला येणार असल्याने पोलीस प्रशासनाने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोगनोळीसह इतरत्र 21 सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त ठेवला आहे. अर्थात महाराष्ट्रातील नेते मंडळींना कर्नाटकात प्रवेश द्यावयाच्या की नाही, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. असे असले तरी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी टोल नाका येथे रविवारी रात्रीपासून 7 सशस्त्र दलाच्या 3 राज्य राखीव दलाच्या तुकड्यासह निपाणी व चिकोडी विभागातील 700 असा एकूण 1 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
– संगमेश शिवयोगी, सीपीआय, निपाणी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news