पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक मुख्यमंत्रीपदावरुन गेली दोन दिवस दिल्लीत चर्चा सुरु आहे. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आज ( दि. १६ ) दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबाबत आज ते पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करणार आहेत.
कर्नाटक मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये खलबते सुरु आहेत. गेली दोन दिवस पक्षश्रेष्ठी याबाबत चर्चा करत आहेत. आज ( दि. १६) काँग्रेस नेते राहुल गांधी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. येथे ते मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव निश्चित करावे, यावर चर्चा करणार असल्याचे मानले जात आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा कोणाचा हाती येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. यावरून काँग्रेसमध्ये खलबते आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसंदर्भात रविवारी (दि.१४) बंगळूरु येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची ( सीएलपी ) बैठक झाली. काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे सरचिटणीस जितेंदर सिंग, माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्या नेतृत्वाखाली रात्री राज्यातील सर्व आमदारांची बैठक झाली. बैठकीत सर्व आमदारांशी चर्चा करुन त्यांची मते घेऊन विधिमंडळाचा गटनेता निवडून मुख्यमंत्री निवडला जाणार होता. पण या बैठकीत सर्व आमदारांनी सर्वानुमते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांडने घ्यावा, असा ठराव करत सर्वाधिकार पक्षाध्यक्षांकडे सोपवण्याचा एका ओळीचा ठराव केला होता.