कर्नाटकातील प्रचाराला नवे वळण

कर्नाटकातील प्रचाराला नवे वळण

प्रचाराला आता कर्नाटकात वेगळे वळण मिळू पाहते आहे. कारण आहे ते हुबळीतील एका विद्यार्थिनीच्या खुनाचे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या खुनाला 'लव्ह जिहाद'चा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सत्ताधार्‍यांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडायची नाही, हा राजकारणातला आणि त्यातही निवडणुकीच्या काळातला नियम असतो. म्हणूनच वाढती महागाई, बेरोजगारी, सरकारी संस्थांचा गैरवापर, लोकशाही मूल्यांची होणारी घसरण आदी काँग्रेसच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. त्याचवेळी राम मंदिर, विकसित भारत, महासत्तेकडे वाटचाल हे भाजपच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. दोन्ही बाजूंनी आपापले मुद्दे जोरकसपणे लावून धरलेले आहेत. त्यात कर्नाटकात आता 'लव्ह जिहाद' या प्रकरणाची भर घालण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हुबळीच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात त्याच कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या युवकाने आपल्यापेक्षा सीनिअर विद्यार्थिनीचा खून केला. प्रथमदर्शनी ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तथापि, युवक-युवती भिन्नधर्मी असल्याने त्याला 'लव्ह जिहाद' मानलं जात आहे. मृत विद्यार्थिनी काँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी. तर संशयित मारेकरी तिच्या आधीपासूनच्या ओळखीचाच. मात्र, तिने त्याचे प्रेम नाकारल्याने त्याने तिचा खून केला.

मानेवर नऊ वेळा चाकूने वार करून खून करणे लक्षात घेता अशा घटना घडू नयेत आणि मारेकर्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी या घटनेचा निषेध झालाच पाहिजे. पोलिसांनी लगोलग संशयित मारेकर्‍याला अटक करून तत्परता दाखवली आहे. मात्र, घटना इथंपर्यंतच मर्यादित नाही. तिचे होणारे परिणाम मोठे आहेत. मृत विद्यार्थिनी जरी काँग्रेसच्या नेत्याची मुलगी असली, तरी त्या घटनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्था काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून बिघडली आहे, असा आता भाजप आपल्या प्रचार सभांमधून प्रचार करत आहे. अर्थात त्यासाठी गेल्या वर्षभरातली आकडेवारी सादर झालेली नाही. ती लगेच सादर होईल, असेही नाही. तथापि, आजच्या युगात तथ्यापेक्षा समजूत किती मजबूत आहे, त्यावर राजकारण चालतं. घटनेनंतर पहिल्या चार दिवसांत तरी हा 'लव्ह जिहाद'चाच प्रकार आहे, असा समज करून देण्यात भाजपला यश आले आहे.

राजकारणात काहीही क्षम्य असल्यामुळे भाजपची ही रणनीती अगदी चुकीची म्हणता येत नाही. तथापि, असे राजकारण करत असताना गेल्या नोव्हेंबर महिन्यात म्हणजे सहा महिन्यांपूर्वी अशीच घटना उडपी जिल्ह्यात घडली होती. बंगलोर विमानतळावर काम करणार्‍या युवतीला तिच्या आईसह लहान बहीण, भावाला युवतीच्या मित्रानं संपवलं होतं. दहा मिनिटांत चौघांचे हत्याकांड घडूनही त्यावेळेला या घटनेविरुद्ध कोणीही ब्र काढले नाही. कारण यावेळी हल्ल्यात बळी पडलेले कुटुंब अल्पसंख्याक आणि हल्लेखोर बहुसंख्याक समाजाचा होता. म्हणजे हा उलटा 'लव्ह जिहाद' होता. खरंतर तो सुद्धा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचाच प्रकार होता. मात्र, निवडणूक नसल्याने त्याकडे कुठल्याही पक्षांन फारसं लक्ष दिलं नाही. हुबळीच्या घटनेत मात्र सत्ताधार्‍यांना थेट जबाबदार धरलं जात आहे. ते योग्यही आहे. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला राज्य सरकार जबाबदार धरलं गेले पाहिजे. तो त्यांच्याच अखत्यारीत येणारा विषय आहे.

अशा घटना वारंवार घडत आहेत का? आणि त्या घडत नसतील तर अशा घटनांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न योग्य आहे का? रिंकू पटेल, अमृता, कविता अशा कैक युवतींची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली आहे. त्यातले मारेकरी बहुतकरून स्वधर्मीय आहेत. त्यामुळे ही एक विकृती आहे. ती एका धर्मापुरती मर्यादित आहे, असं आकडेवारी तरी सांगत नाही. मात्र, सत्तेचा खेळ फक्त आकड्यावर चालतो. ज्याचं बहुमत किंवा जो बहुमताच्या जवळ त्याची सत्ता, हेच आपण स्वीकारलेले सूत्र आहे.

त्यामुळे असा आकडा गाठण्यासाठी हाती लागलेला प्रत्येक मुद्दा मतदारांरापर्यंत पोहोचवणं आणि मत परिवर्तन घडवून आणणं हाच सगळ्याच पक्षांचा अजेंडा आहे. मग महाराष्ट्रातली बंडखोरी असो, तामिळनाडूत सनातन धर्मावर झालेली टीका असो, दिल्लीतला कथित मद्य घोटाळा असो किंवा मणिपूरमधला हिंसाचार असो, एकमेकांवर कुरघोडी ठरलेली आहे. तथापि, त्या कुरघोडीत लोकांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न मागे पडत आहेत, हे आजच्या राजकारणामधील सगळ्यात मोठे दुखणं आहे. कर्नाटकातही 26 एप्रिलला पहिल्या टप्प्यातला मतदान पार पडत असताना लोकांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न मागे पडण्याची भीती आहे. लोकांना ज्या योग्यतेचे सरकार पाहिजे असतं तेच त्यांना मिळतं, असं मानलं जातं. निवडणुकीतल्या प्रचाराचेही असंच असावं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news