पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषभ पंतच्या अपघातावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतकडे छान दिसणारी ब्रँडेड कार होती. अशा परिस्थितीत ती कार चालवण्यासाठी त्याने ड्रायव्हर ठेवणे आवश्यक होते. पंतला ड्रायव्हरचा पगार नक्कीच परवडला असता. त्याला एकट्याने कार चालवण्याची गरज नव्हती, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या युवा खेळाडूंना महत्त्वाचा दिला आहे. एक वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी आपले मत मांडले.
कपिल देव (Kapil Dev) पुढे म्हणाले, मला समजते की लोकांना लक्झरी कार चालवण्याचा छंद किंवा आवड असू शकते. पंतच्या वयात हे होणे स्वाभाविक आहे. मात्र, तुमच्यावरही जबाबदाऱ्या आहेत. स्वतःची काळजी घेण्यासाठी तुम्हाला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य त्या गोष्टी तुम्हाला ठरवाव्या लागणार आहेत. घडलेली दुर्घटना हा एक धडा आहे, त्यातून पंतने शिकावे, असे म्हणत कान टोचले आहेत.
दुबईहून परतल्यानंतर पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होते. यादरम्यान त्यांची कार मोहम्मदपूर जटजवळ दुभाजकाला धडकली आणि आगीच्या भक्षस्थानी पडली. या दुर्घटनेत पंत गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुरकी येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे स्कॅन केल्यानंतर पंतच्या कपाळावर, पायाला, पाठीला, मनगटावर आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. सोमवारी त्याला आयसीयूमधून बाहेर काढून स्पेशल रुममध्ये हलवण्यात आल्याचे डॉक्टरानी सांगितले.
कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, मी नवोदित क्रिकेटपटू असताना माझाही मोटारसायकल अपघात झाला होता. त्या दिवसापासून माझ्या भावाने मला मोटरसायकलला हातही लावू दिला नाही. ऋषभ पंत सुरक्षित असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. त्याला लवकरात लवकर बरे वाटून तो क्रिकेट खेळायला मैदानात उतरावा, अशीही मी सदिच्छा व्यक्त करतो. पंतच्या अपघातातून सर्वांनीच बोध घेणे आवश्यक आहे. रात्रीअपरात्री एकट्याने कार चालवत लांबचा पल्ला गाठणे चुकीचे आहे. निदान कुटुंबियांचा तरी विचार करून असा धोका पत्करू नका, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.