Kapil Dev : अय्यर-किशनवरील कारवाई योग्यच, बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत : कपिल देव

Kapil Dev : अय्यर-किशनवरील कारवाई योग्यच, बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत : कपिल देव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयच्या नव्या केंद्रीय कराराच्या वादात उडी घेतली आहे. त्यांनी बोर्डाची पाठ थोपटत श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना करारातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काही खेळाडूंना त्रास होत असेल तर होऊदे. देशापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी बीसीसीआयचे हे पाऊल आवश्यक आहे, असे म्हणत कपिल देव यांनी युवा खेळाडूंचे कान टोचले आहेत.

बीसीसीआयने नुकतीच आपल्या वार्षिक केंद्रीय कराराची यादी जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. बोर्डाने देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष करणाऱ्या इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना या करारातून डच्चू दिला. त्यानंतर बीसीसीआयचा हा कठोर निर्णय चर्चेचा विषय बनला. काही माजी खेळाडूंनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिल्या. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना या विषयावर आपले मत मांडले.

'बीसीसीआयचे अभिनंदन करतो'

कपिल देव म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर खेळाडू देशांतर्गत क्रिकेट सोडत आहेत, याचे मला वाईट वाटते. बीसीसीआयने अशा खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांना महत्त्व देऊन आपआपल्या राज्याच्या संघांकडून खेळण्याचे आवाहन केले होते. पण काहींनी बोर्डाच्या सूचनेकडेच कानाडोळा केला. अखेर बीसीसीआयला एक ठोस निर्णय घ्यायचा होता, जो त्यांनी घेतला. त्यांच्या वार्षिक केंद्रीय कराराच्या नव्या निर्णयानंतर काही खेळाडूंना त्रास होईल. तो झाला तरी चालेल. कारण देशापेक्षा कोणीही मोठा नाही. देशांतर्गत क्रिकेटच्या रक्षणासाठी उचललेल्या या पावलाबद्दल मी बीसीसीआयचे अभिनंदन करतो.'

'परतफेड करण्याची संधी'

'आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी त्यांच्या संबंधित राज्य संघांसाठी स्वत:ला उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेवर माझा नेहमीच विश्वास आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळणे ही प्रस्थापित स्टार खेळाडूंची जबाबदारी आहे. अशा खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा फायदा इतर खेळाडूंना मिळतो. शिवाय, कधीकाळी राज्य संघानी प्रदान केलेल्या सेवेची परतफेडही करण्याचा हा चांगला मार्ग आहे,' असेही कपिल देव यांनी सांगितले.

पेन्शन वाढवल्याबद्दल बीसीसीआयचा आभारी

बीसीसीआयने माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ केली आहे. या निर्णयावर कपिल देव यांनी बोर्डाचे आभार मानले आहेत. 'मला आनंद आहे की बीसीसीआयने माजी खेळाडूंच्या पेन्शनच्या रकमेत वाढ केली आहे. ज्यांचे कुटुंब पेन्शनवर अवलंबून आहे त्यांच्यासाठी बोर्डाचा हा निर्णय फायदेशीर ठरेल,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news