पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. त्यांनीही हे नाकारलेले नाही. दरम्यान, आज कमलनाथ यांनी छिन्दवाडा येथील आपला नियाेजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
कमलनाथ यांचे पूत्र आणि आमदार नकुलनाथ यांनी त्यांच्या सोशल अकाउंट फेसबूक, एक्स वरून काँग्रेसचे चिन्ह आणि नाव काढून टाकले आहे. कमलनाथ यांच्या सोशल अकाउंटवर माजी मुख्यमंत्री आणि नकुलनाथ यांच्या अकाउंटवर आमदार छिंदवाडा लिहिण्यात आल्याचे दिसून येत आहे. या साऱ्या चर्चांमुळे कमलनाथ कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चेला उधाण आले आहे. दिल्लीमध्ये होत असलेल्या भाजपच्या अधिवेशनानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे मानले जात आहे. दरम्यान कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्याकडून या गोष्टीचे कोणतेही खंडन करण्यात आलेले नाही.
कमलनाथ हे काँग्रेसचे पाच दशकांपासूनचे जुने नेते आहेत. अनेक प्रमुख नेते काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत, परंतु कमलनाथ हे अशा काँग्रेस नेत्यांपैकी एक आहेत जे नेहमीच गांधी घराण्यातील सर्वात निष्ठावान नेत्यांमध्ये होते. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेले कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेससाठी लाेकसभा निवडणुकीपूर्वी माेठा धक्का असेल.
हेही वाचा :